मुंबई : कल्याण पूर्व आणि पश्चिम येथे मी विधानसभा लढविणार असून वेळ आली तर अपक्ष उभा राहीन, अशी घोषणा कल्याण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली आहे. कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांची प्रमूख संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या घोषणेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सचिन पोटे म्हणाले की, "२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील चुकांमधून आपण भरपूर काही शिकलो आहोत. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या २०२४ च्या निवडणुकीचे राजकीय गणित तयार असून कल्याण पूर्व असो की, पश्चिम कोणत्याही परिस्थितीत आपण या निवडणुकीमध्ये उभे राहणार आहोत. पक्षाने तिकीट नाकारले तरी मी निवडणूक लढवणार आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - जैन तीर्थांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : मंत्री मंगल प्रभात लोढा
वाईट काळात पक्षाने साथ दिली!
"आपल्या वाईट काळात काँग्रेस पक्षाने आपल्याला साथ दिली, ओळख दिली. मग पक्षाच्या वाईट काळात आपण त्याची साथ कशी सोडणार? गेल्या दहा वर्षांत पक्ष सोडण्यासाठी आपल्यावर खूप दबाव आला होता, आमिषे दिली जात होती. मात्र आपण आपल्या भूमिकेवर आणि विचारांवर टिकून राहिलो. पण आता एकदा निवडणूक लढण्याचं मी ठरविलं म्हणजे लढविणारच आहे. जर पक्षाने तिकीट नाकारले तर मी अपक्ष उभा राहीन," असेही ते म्हणाले.
"आजही कल्याण पश्चिमेच्या तुलनेत कल्याण पुर्वेची परिस्थिती फारशी चांगली नाही. यासाठी तज्ज्ञ लोकांच्या मदतीने आपण कल्याण पूर्वेच्या विकासाचा रोडमॅप तयार केला आहे. यामध्ये रुग्णालय, अभ्यासिका, पायाभूत सुविधा, मनोरंजनाची साधने आदींचा समावेश असेल. आपण कल्याण पूर्वेचेच रहिवासी असल्याने कल्याण पूर्वेला नेमके काय पाहिजे आहे याची आपल्याला जाण आहे. कल्याण पूर्व असो की कल्याण पश्चिम कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणारच," असा ठाम विश्वास सचिन पोटे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही दुसऱ्याच्या लग्नात लाडू वाटायचे काम केले असा टोला त्यांनी लगावला. तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणखी चांगला उमेदवार द्यायला हवा होता. वैशाली दरेकर यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. तरीही आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी मनापासून काम केल्याने डॉ. श्रीकांत शिंदे यांचा लीड कमी होऊ शकला," असेही त्यांनी सांगितले.