मुंबई : वसईमध्ये एका प्रियकराने भर रस्त्यात आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ही घटना गंभीर असून असून या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे," असे त्यांनी सांगितले.़
हे वाचलंत का? - "पटोलेंचं कृत्य म्हणजे सत्तेची मस्ती!"
मंगळवारी सकाळी वसईच्या चिंचपाडा परिसरात एका तरुणाने एका तरुणीच्या डोक्यात लोखंडी पान्याने सपासप वार करत भररस्त्यात तिची हत्या केली. त्याने तिचा जीव जाईपर्यंत तिच्यावर लोखंडी पान्याने वार केल्याचं सांगण्यात येत आहे. आरती यादव असे २० वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. तर रोहित यादव असे आरोपीचे नाव आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.