मुंबई : नाना पटोलेंचं कृत्य म्हणजे सत्तेची मस्ती होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरींनी केला आहे. सोमवारी एका कार्यकर्त्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय धुतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर आता मिटकरींनी प्रतिक्रिया दिली.
अमोल मिटकरी म्हणाले की, "अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात नाना पटोलेंचे चिखलाने माखले होते. साधारणपणे वारकरी सांप्रदायात एकमेकांच्या पाया पडणं हा प्रकार मी ऐकला होता पण कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणं हा प्रकार पहिल्यांदाच मी बघितला. अशाच प्रकारे जर नेते कार्यकर्त्यांना वापरून घेऊन पाय धुवून घेत असतील तर ही निंदाजनक बाब आहे. एकप्रकारे पक्षाची धारणाही या माध्यमातून लक्षात येते. ही अत्यंत संतापजनक घटना आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे."
"त्यामुळे नाना पटोलेंनी स्वत:ला नेता समजू नये आणि कार्यकर्त्याला आपला नोकर समजू नये. लोकशाहीमध्ये कुणीही मालक नसतो. त्यामुळे कार्यकर्त्यानेसुद्धा उन्मादाच्या भरात असं कुठलंही कृत्य करु नये. ही फक्त सत्तेची मस्ती होती का?" असा प्रश्न त्यांनी नाना पटोलेंना विचारला आहे.