मुंबई : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी कोकणातील स्वाभिमानी जनतेचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी जनतेची माफी मागावी, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणेंनी केले आहे. कोकणात नारायण राणेंनी पैसे वाटले, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर आता नितेश राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
नितेश राणे म्हणाले की, "कोकणातल्या जनतेने लोकशाही पद्धतीने शिवसेनेला नाकारलं, हे सत्य जेव्हा नारायण राणे साहेबांनी मांडलं तेव्हा अपेक्षेप्रमाणे मातोश्रीला आणि संजय राऊतांना मिरच्या लागल्या. पैसे घेऊन मतदान केलं, असं संजय राऊत आणि विनायक राऊत म्हणतात. याचा अर्थ कोकणातला सामान्य मतदार पैसा खातो समजायचा का? आमच्या कोकणातली जनता एवढी स्वाभिमानी आहे की, आतापर्यंत कुठल्याही सरकारकडे कर्जमाफी मागितली नाही. घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करणं ही कोकणातल्या जनतेची सवय आहे. त्यामुळेच राज्य सरकारकडून त्यांना नेहमी प्रोत्साहनकारक निधी जाहीर केला जातो. त्यामुळे कोकणातल्या स्वाभीमानी जनतेचा कुणी अपमान करत असेल तर जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा कोकणातली जनता त्यांच्या शत्रुला उत्तर देईल," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - मुख्यमंत्री शिंदेंना शरद पवाराचं पत्र!
ते पुढे म्हणाले की, "मुळात उद्धव ठाकरेंना कोकणातली जनता समजलीच नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, कोकण हा शिवसेनेचा कणा आहे. पण आज पालघरपासून तर सिंधुदुर्गापर्यंत उद्धव ठाकरेंच्या विकासविरुद्ध आणि रोजगारविरुद्ध प्रवृत्तीला जनतेने नाकारलं. त्यामुळे ठाकरेंचे कार्टे सामान्य मतदारांचा अपमान करत आहे. याबद्दल उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी," असेही ते म्हणाले.