मुंबई : शिवप्रभूंनी ज्या वाघनखांच्या सहाय्याने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखे भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडन येथील 'व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियम'मध्ये असलेली ही वाघनखे येत्या जुलै महिन्यात भारतात आणली जातील, अशी माहिती वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
स्वराज्यावर चालून आलेल्या बलाढ्य अफजलखानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी याच वाघनखांनी बाहेर काढला. शिवरायांच्या पराक्रमाची ही गाथा आजही मराठी मनावर कोरली गेलेली आहे. त्यामुळे प्रतापगडावरील शिवइतिहासाला उजाळा मिळावा, या उद्देशाने राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवरायांची वाघनखे पुन्हा भारतात आणण्याचा निश्चय केला. त्यादिशेने पाठपुरावा सुरू केला आणि त्यात यशही मिळाले. ब्रिटनशी झालेल्या करारानुसार, दि. ४ जून रोजी वाघनखे भारतात येणे अपेक्षित होते. मात्र, आचारसंहितेमुळे त्यात अडथळे आले. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच, पुर्नप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हे वाचलंत का? - कॉपी करुन पास होणाऱ्यांना पारदर्शकता कळणार नाही!
लंडन येथील 'व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियम'मध्ये असलेली ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत. ती सातारा, कोल्हापूर आणि नागपूर येथील संग्रहालयात एक-एक वर्षासाठी ठेवण्याचे नियोजन आहे. वाघनखे लंडनवरून मुंबई आणि तेथून थेट साताऱ्यात नेली जातील. या वाघनखांसाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात विशेष दालन तयार करण्यात आले आहे.
याबद्दल बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ४ जून रोजी भारतात आणण्याचे नियोजन होते. मात्र, आचारसंहितेमुळे त्यात अडथळे आले. आता जुलै महिन्यात ती भारतात आणली जातील. नेमकी तारीख येत्या दोन-चार दिवसांत कळेल."