मुंबई : कॉपी करुन पास होणाऱ्यांना पारदर्शकता कधीच मान्य होणार नाही, असा टोला भाजप आमदार नितेश राणेंनी उबाठा गटाला लगावला आहे. रवींद्र वायकरांच्या विजयावर विरोधकांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांना मतमोजणीत लीड मिळाली होती. पण त्यानंतर या मतदारसंघात फेर मतमोजणी झाली आणि शिवसेनेच्या रवींद्र वायकरांनी ४८ मतांनी विजय मिळवला. मात्र, आता त्यांच्या विजयावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. उबाठा गटाने ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत.
यावर नितेश राणे म्हणाले की, "नेहमी कॉपी करुन पास होणाऱ्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांना पारदर्शक पद्धतीने लागलेला निकाल कधीच मान्य होणार नाही. त्यामुळे ते ईव्हीएमवर आणि निवडणूक आयोगावर आरोप करत आहेत. जनतेने दिलेला कौल नेहमी मोठ्या मनाने स्विकारता आला पाहिजे. पण दुर्दैवाने जनकेता कौल स्विकारण्याएवढे उद्धव ठाकरे मोठ्या मनाचे नाहीत," असेही ते म्हणाले.