चंदीगड : हरियाणातील नुहान जिल्ह्यात बनावट पोलीस अधिकारी म्हणून फसवणूक करणाऱ्या खालिद आणि अकील यांना शनिवार, दि. १५ जून २०२४ पोलिसांनी अटक केली. हे दोन्ही आरोपी डेप्युटी एसपी असल्याची बतावणी करून लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसेही उकळायचे. त्यांचे टार्गेट विशेषत: विद्यमान व माजी सरपंच होते. गतवर्षी दि. ३१ जुलै रोजी नुहान येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्यात खालिदचा हात असल्याचेही सांगितले जात आहे. तेव्हापासून तो फरार होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण नुहान जिल्ह्यातील सायबर पोलिस स्टेशनशी संबंधित आहे. तीन दिवसांपूर्वी माजी सरपंच दिलबाग यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्याने सांगितले होते की, दोन-तीन दिवसांपूर्वी त्याच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. फोन करणाऱ्याने आपली ओळख डेप्युटी एसपी समशेर सिंग अशी केली. कॉलरने गणवेश परिधान केलेल्या समशेर सिंगचा व्हॉट्सॲप डीपीही तयार केलेला होता.
कॉल केलेल्या व्यक्तीने दिलबागकडे ९५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे जमा करण्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचा (एसबीआय) खाते क्रमांकही पाठवला. दिलबागने सांगितले की, डेप्युटी एसपी समशेर सिंग हे त्यांचे पूर्वीचे ओळखीचे होते. त्या जाळ्यात अडकून ९५ हजार रुपये त्या खात्यात ट्रान्सफर केले. पैसे पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच नंबरवरून दिलबागला फोन आला.
फोन करणाऱ्याने दिलबागकडे आणखी पैशांची मागणी केली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे दिलबागच्या लक्षात आले. त्याने कॉलरचे स्क्रीनशॉट आणि रेकॉर्डिंग घेतले आणि सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी तपास केला असता त्यांना या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये दोन जण सामील असल्याचे आढळून आले.
खालिद आणि आकील अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही मेवात येथील रहिवासी आहेत. मुख्य आरोपी खालिद आहे, तर आकील हा त्याचा सहकारी आहे. दि. ३१ जुलै २०२३ रोजी नुहान येथे ब्रिजमंडल यात्रेदरम्यान हिंदूंवर झालेल्या हल्ल्यात खालिदचाही हात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने केवळ हिंदू भाविकांवर दगडफेकच केली नाही तर जाळपोळही केली. सायबर पोलिस ठाण्यावरील हल्ल्यातही त्याचा सहभाग होता.
खालिद गेल्या ११ महिन्यांपासून पोलिसांना चकमा देत होता. तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. शेवटी तो फसवणूकीच्या प्रकरणात कायद्याच्या कचाट्यात सापडला. पोलिसांनी अटक केल्यानंतर अकिलची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, खालिदला सखोल चौकशीसाठी एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडीत दोघेही कान पकडून माफी मागताना दिसले.