भोपाळ : मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील एका गावातून सातत्याने गोहत्या, तस्करी आणि गोमांसाचा व्यापार होत असल्याच्या बातम्या आल्यानंतर प्रशासनाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. शुक्रवार, दि. १४ जून २०२४, प्रशासनाने गौतस्करीशी संबंधित गावात छापा टाकला, ज्यामध्ये ११ घरांमधून गायींचे अवशेष सापडले. या घरांमध्ये गायींचे अवशेषही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचवेळी १५० जिवंत गायींचीही सुटका करण्यात आली, त्यानंतर प्रशासनाने बुलडोझरची कारवाई करत सर्व ११ घरे जमीनदोस्त केली आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका गुप्तचराच्या माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री उशिरा मंडला जिल्ह्यातील नैनपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील भैंसवाही गावात छापा टाकण्यात आला, या छापेमारीत ११ घरांमध्ये गायींचे अवशेष सापडले. या प्रकरणी पोलिसांनी ११ एफआयआर नोंदवून एका आरोपीला अटक केली होती, तर उर्वरित अंधाराचा फायदा घेत पळून गेले होते, मात्र शनिवारी प्रशासनाने महसूल विभागाच्या पथकासह आरोपींची घरे बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त केली.
पोलिसांच्या कारवाईदरम्यान घरांच्या आजूबाजूच्या शेतात आणि तबेल्यांमध्ये सुमारे १५० जिवंत गायी आढळून आल्या. पोलिसांच्या पथकाने त्यांची सुटका केली आणि प्रशासनाच्या मदतीने ८५ जनावरे सुरक्षितपणे गोठ्यात नेण्यात आली. ही सर्व घरे सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे प्रशासनाला आढळून आले, त्यानंतर शनिवार, दि. १५ जून २०२४ सरकारी जमीन मोकळी करण्यासाठी बुलडोझर कारवाई करण्यात आली. या गावात अनेक दिवसांपासून गोहत्या आणि गोहत्येचे आरोप होत आहेत. यापूर्वीही कारवाई करण्यात आली आहे. मात्र यावेळी पोलिसांनी गो तस्करांवर मोठी कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक मंडला यांच्या सूचनेवरून एसडीओपी नैनपूर नेहा पचासिया यांच्या नेतृत्वाखाली नैनपूर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आणि नैनपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बलदेवसिंग मुजळदा यांनी ही कारवाई करून गुन्हा दाखल केला. ११ आरोपींविरुद्ध पशु क्रूरता कायदा आणि गोहत्या बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या छाप्यात पोलीस पथकाने अटक केलेल्या आरोपीची चौकशी सुरू आहे. उर्वरितांना अटक करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे.