नवी दिल्ली : निवडणूक काळात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचार प्रकरणी भाजपकडून नवे पाऊल उचलले जात आहे. भाजपकडून सदर हिंसाचारप्रकरणी नवी समिती स्थापन करण्यात आली असून त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या नेतृत्वाखाली चार नेत्यांची समिती असणार आहे. या समितीकडून लवकरच हिंसाचाराच्या घटनांचा अहवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना सादर करणार आहे.
दरम्यान, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांना भाजप समितीचे समन्वयक बनवण्यात आले आहे. या चार सदस्यीय समितीमध्ये माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, राज्यसभा खासदार आणि उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी ब्रिजलाल आणि खासदार कविता पाटीदार यांचाही समावेश करण्यात आला आहे. समिती स्थापन करून भाजपने पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचारावरून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
भाजपने म्हटले आहे की, “भारतातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. सार्वत्रिक निवडणुकांसोबतच तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही पार पडल्या असून सत्तांतरण शांततेत पार पडले. पश्चिम बंगाल वगळता कुठेही राजकीय हिंसाचाराची घटना घडलेली नाही. "पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य आहे जे निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराच्या कचाट्यात सापडले आहे, जसे की आम्ही २०२१च्या विधानसभा निवडणुकीनंतर पाहिले.", असे भाजपने म्हटले आहे.