मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडून शिवाजी शेंडगेंना उमेदवारी जाहीर!

    13-Jun-2024
Total Views |
 
Eknath Shinde
 
मुंबई : लवकरच विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूका होणार असून मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी घोषित केली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी गुरुवार, १३ जून रोजी ही घोषणा केली.
 
येत्या २६ जून रोजी मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. तर १ जुलै रोजी या निवडणूकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, आता मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी दिली आहे.
 
हे वाचलंत का? -  जरांगे आणि शिष्टमंडळ बैठकीत काय घडलं?
 
याबाबत बोलताना संजय मोरे म्हणाले की, "नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी किशोर दराडे यांचे नाव आधीच घोषित केलेले आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आम्ही शिवाजी शेंडगे यांचे नाव शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करत आहोत. शेंडगे यांनी याआधी २०१८ मध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन चांगले यश मिळवले होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे कोणतेही मतभेद न बाळगता शिवसेना ही निवडणूक लढवणार आहे आणि पूर्ण ताकद लावून आपला पुरस्कृत उमेदवार निवडून देणार आहे," असे त्यांनी सांगितले.
 
मुंबई शिक्षक मतदारसंघात उबाठा गटाचे जगन्नाथ अभ्यंकर, शिवसेनेचे शिवाजी शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी नलावडे आणि समाजवादी गणराज्य पार्टीचे सुभाष मोरे यांच्यात थेट लढत रंगणार आहे. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.