लखनौ : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील एका तरुणीने अब्दुल्ला पठाण या यूट्यूबर आणि बोगस डॉक्टरवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. पीडित तरुणी मूळची गोरखपूर जिल्ह्यातील आहे. अब्दुल्ला पठाण याने नोकरीचे आमिष दाखवून तिला अंमली पदार्थ देऊन बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. या काळात पीडितेचा अश्लिल व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करून तिचा गर्भपात करण्यास भाग पाडले.या प्रकरणात अब्दुल्लासोबत त्याचा भाऊ अब्दुल मलिक याचेही नाव आहे. पोलिसांनी सोमवार, दि. १० जून २०२४ अब्दुल्ला पठाणविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
हे प्रकरण मुरादाबादच्या कुंडरकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. याठिकाणी एका महिलेने अब्दुल्ला पठाण आणि त्याच्या भावासह अन्य एका अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, २०२१ मध्ये तिची सोशल मीडियाच्या माध्यमातून अब्दुल्ला पठाण याच्याशी भेट झाली होती. काही काळानंतर अब्दुल्लाने गोरखपूर येथील एका महिलेला मुरादाबाद येथील त्याच्या दवाखान्यात १५ ते २० हजार रुपयांची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्याने पीडितेला आश्वासन दिले की त्याच्या दवाखान्यामध्ये अनेक महिला आधीच काम करतात.
अब्दुल्लाने नोकरीसोबतचं तरुणीला मोफत निवास आणि भोजनाचेही आश्वासन दिले होते. अब्दुल्लाच्या आमिषाला बळी पडून पीडित तरुणी जुलै २०२१ मध्ये गोरखपूरहून मुरादाबादला पोहोचली. येथे आरोपीने पीडितेला भाड्याच्या खोलीत ठेवले. चार महिने दवाखान्यामध्ये काम केल्यानंतर अब्दुल्लाने महिलेला लवकरच फोन करेल असे सांगून तिला तिच्या घरी परत पाठवले. जानेवारी २०२३ मध्ये अब्दुल्ला पठाण स्वतः गोरखपूरला गेला आणि मुलीला घेऊन मुरादाबादला आला. यावेळी त्याने मुलीला कुंडरकी परिसरातील त्याच्याच एका घरात डांबून ठेवले.
अब्दुल्ला पठाणने जानेवारी २०२३ मध्येच पीडितेला ड्रग्ज देऊन याच घरात तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यावेळी त्याने मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला. मुलीच्या गावात व्हायरल करण्याची धमकी देऊन अब्दुल्लाने पीडितेवर रोज बलात्कार सुरू केला. बलात्कार पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिने डिसेंबर २०२३ मध्ये मुलीचा गर्भपात केला. गुरुवार, दि. ६ जून अब्दुल्लाचा भाऊ अब्दुल मलिक एका अज्ञात व्यक्तीसह पीडितेच्या खोलीत आला. त्याने तरुणीवर तिच्यासोबत आलेल्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला.
महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिने नकार दिल्यावर अब्दुल मलिक आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी अब्दुल मलिक याने महिलेला बंदूकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर पीडितेने अब्दुल्ला पठाणला आपल्या भावाच्या कृत्याबद्दल सांगितले तेव्हा त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्याने पीडितेला त्याच्या मोठा भाऊ असण्याचं कारण देत सर्वकाही विसरण्याचा सल्ला दिला. यासोबतच कुठेही तोंड उघडल्यास अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली.
अखेर पीडितेच्या संयमाचा बांध फुटला आणि कोणत्याही परिस्थितीत आरोपींना धडा शिकवण्याचा त्यांचा निर्धार होता. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अब्दुल्ला पठाण, त्याचा भाऊ अब्दुल मलिक आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आयपीसीच्या कलम ३७६-डी, ३१३ आणि ५०६ अंतर्गत हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अब्दुल्ला पठाणच्या भावावर पोलिसांत तक्रार करून पोलिस ठाण्यात दबाव टाकल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.