चेन्नई : बाहुबली चित्रपटात 'कटप्पा'ची भूमिका साकारणारा तमिळ अभिनेता सत्यराज याने यूपी-बिहारसारख्या उत्तरेकडील राज्यांतून आलेल्या परप्रांतीय मजुरांची खिल्ली उडवून वाद निर्माण केला आहे. तमिळनाडूतील त्रिची येथे एका कार्यक्रमात बोलताना सत्यराज म्हणाला की, स्थलांतरित कामगारांना "स्वाभिमान म्हणजे काय हे शिकवले पाहिजे." तो म्हणाला की, उत्तरेकडील राज्यांतील स्थलांतरित कामगारांना “द्रविड मॉडेल आणि विचारसरणीची तत्त्वे” शिकवणे महत्त्वाचे आहे.
यापूर्वी सत्यराज यांने उदयनिधी स्टॅलिनच्या 'सनातनचा नायनाट करा' या विधानाचे समर्थन केले होते आणि त्याबद्दल उदयनिधींचे कौतुकही केले होते. द्रमुकचा समर्थक समजल्या जाणाऱ्या सत्यराजने तामिळनाडूतून परदेशात होणारे स्थलांतर आणि देशाच्या उत्तरेकडील राज्यांतून तामिळनाडूत स्थायिक होणाऱ्या स्थलांतरितांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत माहिती देताना हे विधान केले.
त्याने तामिळनाडूत येणाऱ्या उत्तर भारतीय मजुरांची तुलना अमेरिका आणि ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या भारतासारख्या देशातील लोकांशी केली. सत्यराज म्हणाला की, ज्या कामगार वर्गाने आपल्या जीवनात समस्यांना तोंड दिले आहे, ते तामिळनाडूत येतात आणि अमेरिकेप्रमाणेच तामिळनाडूला त्यांचे आवडते ठिकाण म्हणून पाहतात.
पुढे बोलताना सत्यराज म्हणाला, “उत्तर राज्यातील कामगार इथे का येतात? ते इथे येतात कारण इथे सर्व काही ठीक नाही ना? सर्व स्थलांतरितांना आमचे द्रविड मॉडेल, द्रविड तत्वज्ञान जाणून घेण्याची संधी मिळत नाही. तर हे लोक पिढ्यानपिढ्या इथे स्थायिक होतात.
ज्याप्रमाणे अमेरिकेत पोहोचलेले लोक तिथे स्थायिक होतात आणि त्यांना अमेरिका सोडण्याची इच्छा नसते, त्याचप्रमाणे बिहारसारख्या ईशान्येकडील भारतीय राज्यांतून आलेले लोकही स्थायिक होतात. त्यांना अमेरिकेसारखे तामिळनाडू सोडायचे नाही, त्यांच्यासाठी तमिळनाडू अमेरिकेसारखे असेल.
सत्यराज हा द्रविडीयन विचारसरणीचा पुरस्कृता आहे आणि अनेकदा त्याच्या भाषणातून आणि चित्रपटांमधून या विचारांचा प्रचार करतो. यापूर्वी सत्यराजने उदयनिधी स्टॅलिनचे समर्थन केले होते, त्यावेळी स्टॅलिनने सनातन परंपरेबाबत वादग्रस्त विधाने करून सनातनला संपवण्याची भाषा केली होती. स्टॅलिनने सनातनची तुलना डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांशी केली होती. त्यावेळी सत्यराजने उदयनिधी स्टॅलिनला पाठिंबा दर्शवला होता.