दुबईत बसून भाजप नेत्यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी आवळल्या मोहम्मद वसीमच्या मुसक्या

    12-Jun-2024
Total Views |
 Raja Singh
 
हैदराबाद : परदेशात बसून भारतातील हिंदुत्ववादी नेत्यांना धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद वसीम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ४० वर्षीय वसीम गेल्या १० वर्षांपासून दुबईत होता. वसीमला मंगळवार, दि. ११ जून २०२४ राजीव गांधी विमानतळावरून अटक करण्यात आली. गोशमहल विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार टी राजा सिंह यांना त्यांनी दुबईतून अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली होती.
 
गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना धमकीचे फोन येत होती. परदेशातून येणाऱ्या धमक्यांमध्ये इस्लामिक देश प्रमुख असायचे. राजा सिंग यांना 'सर तन से जुदा' करू किंवा कुटुंबासमवेत बॉम्बने उडवू, अशा आशयाच्या धमक्या येत. या धमक्या देणाऱ्यांमध्ये मोहम्मद वसीमचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. ४० वर्षीय मोहम्मद वसीम हा मूळचा हैदराबादमधील चंद्रायण गुट्टा भागातील रहिवासी आहे.
 
  
१० वर्षांपूर्वी तो हैदराबादहून दुबईला कमाईसाठी गेला होता. तो येथे टॅक्सी चालवत असे. राजा सिंह यांच्या माहितीनुसार, वसीम त्यांना दुबईतून सतत फोन करत होता आणि जीवे मारण्याची धमकी देत होता. धमकी देण्यासाठी तो वेगवेगळ्या ॲपचा वापर करत होता. टी राजा सिंह यांच्या तक्रारीवरून हैदराबाद पोलिसांनी दि. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायबर क्राइम पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. हा एफआयआर आयपीसी ५०६, ५०७ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
 
पोलिस तपासात वसीमचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एलओसी (लूक आऊट सर्कुलर) जारी केले होते. मंगळवार, दि. ११ जून २०२४ वसीम दुबईहून विमानाने हैदराबाद विमानतळावर पोहोचला. आधीच सतर्क असलेल्या पोलिसांनी वसीमला ताब्यात घेतले. त्याला सायबर क्राईम पोलिस ठाण्यात आणून चौकशी करण्यात येत आहे.
  
राजा सिंह यांनी तेलंगणा सरकारवर त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. वसीमसारखे किमान दोन हजार कट्टरपंथी त्यांना सतत फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. वारंवार तक्रारी करूनही पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाहीत किंवा आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोपही राजा सिंह यांनी केला आहे.