मुंबई : हिंमत असेल तर नाना पटोलेंनी ठाकरेंची मुंबई पदवीधरची जागा मिळवून दाखवावी, असे आव्हान भाजप आमदार नितेश राणेंनी केले आहे. विधानपरिषदेच्या चारही जागांवर उबाठा गटाने आपले उमेदवार जाहीर केल्याने मविआमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता ठाकरेंनी कोकण पदवीधरच्या जागेवर काँग्रेसला पाठींबा जाहीर केला आहे. यावर आता नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे म्हणाले की, "उबाठा गटाने काँग्रेसला कोकण पदवीधरची जागा दिली. पण माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसच्या दिल्लीच्या नेतृत्वाने यांना मातोश्रीवर धमकी दिली आहे. तुम्हाला अशा प्रकारे कारभार करायचा असल्यास मविआमध्ये उबाठाला किती दिवस ठेवायचं, याचा विचार करावा लागेल, अशी धमकी काँग्रेसने दिली आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - शासनाने नोटिफिकेशन जारी केलंय, जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"उद्धव ठाकरेंचे मुंबईचे सगळे खासदार काँग्रेसमुळेच निवडून आले आहेत. त्यामुळे नाना पटोलेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी ठाकरेंची मुंबई पदवीधरची जागा मिळवून दाखवावी. कारण कोकण पदवीधरची जागा ठाकरे हरणार असल्याने ती जागा आता तुम्हाला देऊ केली आहे. त्यामुळे यावर काँग्रेसने निर्णय घ्यावा," असेही ते म्हणाले.