शासनाने नोटिफिकेशन जारी केलंय, जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12-Jun-2024
Total Views |
मुंबई : सगे सोयरे संबंधीच्या मुद्दावर शासनाने पहिलं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. त्यामुळे मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषण करत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर आहे. त्यांच्या मागण्यांवर कारवाईही करण्यात येत आहे. मागच्या वेळी जाळपोळीच्या व्यतिरिक्त असलेल्या केसेस मागे घेण्याबाबत आम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं. त्यावरही आता वेगाने कारवाई सुरु आहे. त्यासोबतच सगे सोयरे संबंधीच्या मुद्दावर शासनाने पहिलं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. यावर कारवाई सुरु आहे. मी स्वत: यासंदर्भात ओबीसी नेत्यांशी चर्चा सुरु केली आहे. त्यांना मी समजावून सांगणार आहे की, सरकारने काढलेलं हे नोटिफिकेशन ओबीसी समाजाच्या विरोधात नाही."
"ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे त्यांना आजही सर्टिफिकेट देता येतं. सर्वोच्च न्यायालयाने रक्ताच्या नात्यासंदर्भात ठरवून दिलेल्या निकषांमध्ये बसणारं हे नोटिफिकेशन आहे. त्यामुळे या नोटिफिकेशनमुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. सरकार जर वेगाने सगळे प्रयत्न करत आहे तर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं पाहिजे. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने नेहमी सकारात्मक भूमिका घेतली आहे," असे ते म्हणाले आहेत.