दोन जागा जास्त मिळाल्याने काँग्रेसने शेफारून जाऊ नये : संजय राऊत
12-Jun-2024
Total Views |
मुंबई : दोन जागा जास्त मिळाल्याने काँग्रेसने शेफारून जाऊ नये, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंनी आपला फोन उचलला नसल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला होता. त्यामुळे विधानपरिषदेच्या जागांवरून महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. यावर चार जागा जास्त मिळाल्याने शेफारून जाऊ नये, असा टोला राऊतांनी नाना पटोलेंचं नाव न घेता लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, "कोकणची जागा काँग्रेसला मिळणार आहे. काल रात्री यावर आमची आपापसात चर्चा झाली. त्यात नाना पटोलेसुद्धा सहभागी होते. प्रत्येक चर्चेत उद्धव ठाकरेंना आणलंच पाहिजे असं नाही. आम्ही त्यांच्या सुचनेनुसारच काम करतो. आम्ही किशोर जैन यांना कोकणमधून उमेदवारी जाहीर केली होती. ते आता आपली उमेदवारी मागे घेणार आहेत. आम्ही चारही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूका लढवू."
"महाविकास आघाडीत छोटा मोठा भाऊ असं काहीही नाही. आम्ही एकमेकांच्या मदतीने लोकसभेच्या जागा जिंकलो आहोत. या निवडणूकीत सगळ्यात जास्त संघर्ष आमच्या वाट्याला आला होता. आम्हीसुद्धा मोठ्या मनाने स्वत:ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारात झोकून दिलं होतं. त्यामुळे दोन जागा कोणाला जास्त मिळाल्या तर त्या मविआला मिळाल्या असं आम्ही म्हणतो. आम्हाला चार जागा जास्त मिळाल्या असत्या तर आम्ही असं शेफारून बोललो नसतो. यात सगळ्यांची मेहनत आहे," असे ते म्हणाले.