मुंबई : मध्य रेल्वेवर घेण्यात आलेला जम्बो मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रंचड हाल होताना दिसून येत आहे. जम्बो मेगाब्लॉकमुळे बेस्ट बसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या असून प्रवाशांना पर्यायी मार्ग म्हणून ज्यादा बस सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, बेस्ट बस फेऱ्या वाढविल्या असल्या तरी सीएसएमटी स्थानकातून एकही लोकल सुटलेली नसल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, मध्य रेल्वेचा तीन दिवसांचा जम्बो ब्लॉक शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरु झाला असून रविवारी दुपारी ४ पर्यंत संपणार आहे. नोकरदारवर्गास घरातूनच काम असेल तरच बाहेर पडा असे आवाहनदेखील रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले होते. तसेच, शनिवारी सीएसएमटीतून एकही लोकल सुटणार नसल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत.
सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नं. १० व ११ च्या रुंदीकरणाच्या कामासाठी जम्बो मेगाब्लॉक मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. या ६३ तासांच्या मेगाब्लॉक कालावधीत तब्बल ९३० लोकल फेऱ्यांसह ७२ मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत असून मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते दादर एकही लोकल धावणार नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, बेस्ट व एसटी महामंडळाने जादा फेऱ्या चालविल्याने काही अंशी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेने चर्चगेटहून दादरपर्यंत प्रवास करून दादर येथून मध्य रेल्वेवर प्रवास करता येणार आहे. एकंदरीत, मध्य रेल्वेवर शुक्रवारी मेगाब्लॉकदरम्यान अत्यंत कमी लोकल फेऱ्या चालविण्यात आल्या.