मुंबई : विजय वडेट्टीवारांचे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, असा टोला भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच जयंत पाटील भाजप किंवा काँग्रेसच्या वाटेवर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
प्रविण दरेकर म्हणाले की, "देशातील जनतेचा कौल हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर दिसतोय. त्याचे प्रतिबिंब मतदानाच्या दिवशी दिसले. कुठल्याही परिस्थितीत भाजप ४०० पार होईल याबाबत आमच्या मनात कुठलीही शंका नाही. विजय वडेट्टीवार कशाच्या आधारे बोलतात? त्यांचे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. महाराष्ट्रात त्यांचे काय होते हे आधी त्यांनी पाहावे. ३४० बोलत असताना तिघांचे मिळून ४० असे कदाचित त्यांना बोलायचे असेल," असा टोला त्यांनी लगावला. तसेच जयंत पाटील यापूर्वीच भाजपात किंवा काँग्रेसमध्ये जातील असे चित्र होते. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे भविष्य त्यांना माहित आहे. म्हणून अशा प्रकारचा निर्णय जयंत पाटील घेऊ शकतात, असा दावाही दरेकरांनी केला.
हे वाचलंत का? - पुणे अपघाताची पुनरावृत्ती! अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला चिरडले
इंडिया आघाडीवर बोलताना ते पुढे म्हणाले की, "त्यांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केला असता. त्यांच्यात आजही एकवाक्यता नाही, उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला जात नसल्याचे समजते. शरद पवार, ममता बॅनर्जीही जात नसल्याचे समजते. निकालाअगोदर इंडिया आघाडीची अशी अवस्था आहे, तर भविष्यात काय होणार? असेही ते म्हणाले.