मुंबई : नाचता येईना अंगण वाकडे अशी गत झाल्याने काँग्रेसने ‘एक्झिट पोल‘मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
चंद्रशेखर बावनकुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "नाचता येईना अंगण वाकडे अशी गत असलेल्या काँग्रेस पक्षाने निवडणुकीपूर्वी निकालाचे अंदाज व्यक्त करणाऱ्या ‘एक्झिट पोल‘ मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला मतदान पडत नाही म्हणून त्यांना ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड दिसतो. त्यांना बहुमत प्राप्त होत नाही म्हणून ते निवडणूक आयोगाला दोष देतात. त्यांच्या मनासारखे न बोलणाऱ्या पत्रकाराला ते अप्रामाणिक ठरवतात. त्यांच्या विरोधात निकाल गेल्यावर ते न्यायाधीश व न्यायालयांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात आणि आता एक्झिट पोल त्यांच्या बाजूचे असणार नाहीत म्हणून त्यात ते सहभागीच होणार नाहीत. देशातल्या या सगळ्यात जुन्या पक्षाची झालेली ही वाताहत दुर्दैवी आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - मुहूर्त ठरला! ४ जूननंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार
लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध टीव्ही चॅनेल, सोशल आणि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस पक्ष आपले प्रवक्ते पाठवणार नाही. काँग्रेसच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.