जपानला मागे टाकत भारत बनला जगातील सर्वात मोठा सौरऊर्जा उत्पादक देश

    09-May-2024
Total Views |
solar India 
 
नवी दिल्ली : जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौरऊर्जा उत्पादक बनला आहे. भारताने ८ वर्षात ६ स्थानांनी झेप घेत ही कामगिरी केली आहे. सौरऊर्जेच्या बाबतीत भारताने गेल्या काही वर्षांत खूप काम केले आहे. भारत आता पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांऐवजी अक्षय ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मिती करण्याची क्षमता वाढवत आहे.
 
जगभरातील स्वच्छ ऊर्जेच्या प्रगतीबाबत अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या अंबर या संस्थेने म्हटले आहे की, जपानला मागे टाकून भारत २०२३ मध्ये जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे. २०१५ मध्ये भारत या यादीत नवव्या क्रमांकावर होता आणि अवघ्या आठ वर्षांत सहा स्थानांनी झेप घेतली आहे. जगातील सौरऊर्जा जोडण्यात भारताचे योगदान ५.९ टक्के आहे.
 
अंबरच्या मते, भारतात सध्या ११३ Twh सौर ऊर्जा क्षमता आहे. २०१४ मध्ये ही क्षमता फक्त ४.९१ Twh होती. अशा स्थितीत ९ वर्षांत २३ पटीने वाढ झाली आहे. फक्त २०२३ या वर्षात भारतामध्ये १८ Twh सौर उर्जा क्षमता वाढली आहे. भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील सौरऊर्जेचे योगदानही वाढत आहे. २०१५ मध्ये, भारताच्या एकूण वीज निर्मितीपैकी फक्त ०.५ टक्के सौर स्त्रोतांकडून येत होते, तर २०२३ मध्ये ते ५.८ टक्क्यापर्यंत वाढले आहे. सध्या भारतात जलविद्युत उर्जेनंतर सौर ऊर्जा हा स्वच्छ ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.
  
सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार सतत नवीन योजना आणत आहे. भारताने अलीकडेच पीएम सूर्यघर योजना सुरू केली आहे. याअंतर्गत केंद्र सरकार १ कोटी घरांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान देणार आहे. यातून निर्माण होणारी वीज लोक त्यांच्या घरातही वापरू शकतील. याशिवाय जी वीज शिल्लक आहे, ती सरकार खरेदी करेल. यामुळे कोळशावर आधारित विजेवरचा ताण कमी होईल आणि पर्यावरणाचेही रक्षण होईल.
 
भारताने २०३० पर्यंत आपल्या एकूण उर्जेच्या ५० टक्के गरजा अक्षय उर्जा स्त्रोतांमधून पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी भारतात सातत्याने नवनवीन सौरऊर्जा संयंत्रे बसवली जात आहेत. सध्या जगातील सर्वात मोठे सौर ऊर्जा पार्क भारतात आहे. भारत आपल्या वाळवंट क्षेत्राचा वापर मोठमोठे सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी करत आहे.