भारत संरक्षण सामग्रीच्या क्षेत्रातही लवकरच बनणार आत्मनिर्भर!

    09-May-2024
Total Views |
 India Army
 
नवी दिल्ली : संरक्षण सामग्रीच्या खरेदीत जगात पहिल्या क्रमांकावर असलेला भारत आता या क्षेत्रातही आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. भारतीय लष्कराने पुढील वर्षापासून कोणत्याही प्रकारचा दारूगोळा आयात न करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५-२६ नंतर भारतीय लष्कर देशातर्गंत उत्पादकांकडूनच दारूगोळा खरेदी करेल.
 
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराला १७५ प्रकारच्या दारूगोळ्याची गरज भासते. भारतीय लष्कर यातील बहुतांश दारुगोळा परदेशातून आयात करते. मात्र, आता १७५ पैकी १५० प्रकारचा दारूगोळा भारतात तयार केला जात आहे. या दारुगोळ्याचे उत्पादन भारतीय कंपन्या करत आहेत.
 
त्यामुळे देशाचे संरक्षण क्षेत्रही स्वावलंबी होणार असून परदेशात जाणारा पैसाही वाचणार आहे. असे सांगण्यात आले आहे की भारत परदेशातून दरवर्षी ६०००-८००० कोटी रुपयांचा दारूगोळा आयात करते. भारतात सरकारी कारखान्यांबरोबरच खासगी कारखान्यांमध्ये दारूगोळा तयार केला जातो. या कंपन्या लष्कराच्या गरजेनुसार दारूगोळाही बनवत आहेत. यासोबतच भारतात बनलेला दारूगोळा परदेशात निर्यात केला जात आहे.