पुणे : मंगळवारी लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असून शरद पवारांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी अनेक दशकांनंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून मतदान केले आहे. शरद पवारांनी माळेगाव येथील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कुल येथील मतदानकेंद्रावर जाऊन मतदान केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर यंदा बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. याठिकाणी प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. बारामती लोकसभेत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत आहे.
हे वाचलंत का? - राज्यात तिसऱ्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान!
गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार मुंबईमध्ये मतदान करत होते. परंतू, यावेळी सुप्रिया सुळेंसाठी त्यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव इथे मतदानाचा हक्क बजावला आहे. शरद पवारांची प्रकृती ठीक नसल्याने दोन दिवसांपासून ते प्रचारात सहभागी होताना दिसले नाहीत. मात्र, आता त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. यासोबतच सुप्रिया सुळे यांनीदेखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.