वडेट्टीवारांना मोठा दणका! चेन्निथला म्हणाले, "त्याबद्दल आमचा संबंध नाही..."

06 May 2024 16:25:49

Vijay Wadettivar & Ramesh Chennithla 
 
मुंबई : विजय वडेट्टीवारांच्या मताशी काँग्रेसचा संबंध नाही, असे म्हणत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी त्यांना चांगलाच दणका दिला आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी २६/११ च्या हल्ल्यातील शहीद हेमंत किरकिरे यांच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप केला होता. याबद्दल रमेश चेन्नीथला यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
मुंबईतील २६/११ च्या पाक पुरस्कृत दहशदवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतून लागली नव्हती. ती गोळी एका रा.स्व.संघाच्या समर्थक पोलीस अधिकाऱ्याने चालवली होती, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावरुन त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात येत असून त्यांचा निषेध करण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  रामदास आठवले राहूल गांधींची तक्रार करणार!
 
याबद्दल बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, "महाविकास आघाडी पुढे चालत आहे. जनतेच्या भावना काँग्रेस आणि मविआसोबत आहेत. त्यामुळे हरणारे लोकं पाकिस्तान, इंडीया, हिंदू, मुस्लिम असं बोलत राहतील. परंतू, वडेट्टीवारांनी एका पुस्तकाचा आधार घेऊन वक्तव्य केलं आहे. ते काँग्रेस पक्षाचं मत नाही. त्यांनी एस. एन. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा आधार घेतला आहे. कोणालाही एखाद्या पुस्तकावर टिपण्णी करण्याचा अधिकार असतो. आम्ही शहीद हेमंत किरकिरेंचा आदर करतो. आमच्या सरकारने दोषींना फाशी देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवारांनी एका पुस्तकावर टिपण्णी केली असून काँग्रेस पक्ष त्यांच्या मताशी सहमत नाही," असे ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0