भाजप आणि काँग्रेसच्या कचाट्यात केसीआर!

    04-May-2024   
Total Views |
 
kcr
 
माजी मुख्यमंत्री केसीआर यांनी बसयात्रा काढून १७ दिवसांत राज्यातील सर्व १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये जाण्याचा मनसुबा आखला आहे. दि. १३ मे रोजी होणारे मतदान पाहता त्यांचा दौरा १० मे रोजी संपणार आहे. या दौर्‍यात एकीकडे ते भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत असताना, दुसरीकडे तेलंगणमधील जनतेची दिशाभूल आणि फसवणूक केल्याबद्दल मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत.
 
लोकसभेच्या एकूण १७ जागा असलेल्या तेलंगणात तीन पक्षांची लढत आहे. पाच महिन्यांपूर्वी ‘भारत राष्ट्र समिती’चा (बीआरएस) पराभव करून राज्यात सत्तेवर आलेली काँग्रेस पाच वर्षांची कामगिरी मागे टाकून आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे, तर यंदा दक्षिणेतून वाढीव जागा मिळवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. वेगळे राज्य बनल्यानंतर दहा वर्षांनंतर प्रथमच बीआरएससमोर आपली जुनी कामगिरी कायम ठेवण्याचे आव्हान आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बीआरएसला नऊ, भाजपला चार आणि काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘ऑल इंडिया मजलिसे-इत्तेहादुल मुस्लीमीन’ने (एआयएमआयएम) चार दशकांपासून हैदराबादच्या जागेवर आपली परंपरागत पकड कायम ठेवली होती. परंतु, यावेळी पाच वर्षांपूर्वीसारखी हवा राहिलेली नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत नऊ जागा जिंकणार्‍या बीआरएसची दोन्ही राष्ट्रीय पक्षांसोबत धडपड सुरू आहे. तसे न झाल्यास भाजप-काँग्रेस यांच्यातच लढत होईल आणि मतांची टक्केवारी आणि जागांच्या बाबतीत भाजप पुढे येईल, यात नवल नाही.
 
सत्तेच्या समीकरणाबरोबरच राजकारणाचा दृष्टिकोनही बदलला आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून (अभाविप) राजकारणाला सुरुवात करणारे आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करून पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले रेवंत रेड्डी भाजपप्रमाणेच जागा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांच्यासमोर बीआरएसप्रमुख के. चंद्रशेखर राव हे प्रतिस्पर्धी होते. निवडणुकीनंतर रेवंत सत्तेवर आल्यावर त्यांनी केसीआरवरच निशाणा साधला. सत्तेतून हकालपट्टी होताच केसीआर यांचे पक्षावरील नियंत्रणही सैल झाल्याचे दिसून येत आहे. तेलंगण विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जोर लावून आठ जागा जिंकणारा भाजपही बीआरएसच्या नेत्यांना आपल्याकडे खेचून घेत आहे.
 
भाजपने राज्यातील १७ पैकी नऊ जागांवर बीआरएसमधून भाजपमध्ये आलेल्यांना उभे केले आहे. काँग्रेस आणि भाजपने बीआरएस आणि केसीआरसमोर दुहेरी आव्हान उभे केले आहे. पाच महिन्यांपूर्वी बीआरएस अजिंक्य मानली जात होती. केसीआर यांचा स्वत:वर इतका विश्वास होता की, त्यांनी विधानसभा निवडणुकीपेक्षा राष्ट्रीय राजकारणावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. ते राज्याबाहेर स्वत:साठी नव्या भूमिकेच्या शोधात होते, पण राज्याच्या निवडणुकीच्या निकालाने समीकरण बदलले. बीआरएसचा दारुण पराभव झाला आणि तेव्हापासूनच केसीआर यांचीही चक्रे फिरली आहेत.
 
माजी मुख्यमंत्री केसीआर यांनी बसयात्रा काढून १७ दिवसांत राज्यातील सर्व १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये जाण्याचा मनसुबा आखला आहे. दि. १३ मे रोजी होणारे मतदान पाहता त्यांचा दौरा १० मे रोजी संपणार आहे. या दौर्‍यात एकीकडे ते भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत असताना, दुसरीकडे तेलंगणमधील जनतेची दिशाभूल आणि फसवणूक केल्याबद्दल मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. केसीआर यांनी आरोप केला आहे की, रेवंत रेड्डी यांनी तेलंगणातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश येत आहे. विशेष म्हणजे, बीआरएसच्या पराभवानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली होती. परिणामी, पक्षाचे डझनभर बडे नेते आणि मंत्र्यांनी पक्ष सोडून काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशा परिस्थितीत पक्षाला पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आणण्यासाठी केसीआर यांनी त्यांचा मुलगा आणि पक्षाचे कार्याध्यक्ष ‘केटीआर’ या नावाने प्रसिद्ध असलेले केटी रामाराव आणि केसीआर सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले केसीआर यांचे पुतणे हरीश राव यांना सोबत घेतले.
 
उत्तर भारतातील सर्व राज्यांमध्ये अतिशय मजबूत स्थितीत असलेल्या भाजपने ‘मिशन ३७०’ पूर्ण करण्यासाठी दक्षिणेकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी कर्नाटकपाठोपाठ तेलंगणमध्येही पक्षाने मोठी उलथापालथ करण्याची तयारी केली आहे. या राज्यातील लढत तिरंगी असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्माई नेतृत्वामुळे तेलंगणमध्ये मोठा विजय मिळवण्याचा भाजपला विश्वास आहे.
 
भाजप उत्तर तेलंगणावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. विद्यमान चारपैकी तीन खासदार याच भागातील आहेत. हा आतापर्यंत बीआरएसचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, अलीकडेच दोन विद्यमान बीआरएस खासदार, नागरकुर्नूलमधील पोटुगंती रामुलू आणि झहीराबादमधील बी. बी. पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या दोन प्रभावशाली नेत्यांच्या भाजप प्रवेशाने पक्षात खळबळ उडाली आहे. याशिवाय, पक्षाने त्या १९ विधानसभा जागांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे, ज्यात ते गेल्या विधानसभा निवडणुकीत उपविजेते ठरले होते. या सर्व १९ जागांवर काँग्रेसने बाजी मारली होती. मात्र, यावेळी काँग्रेसला मात देण्यात यश येईल, असा पक्षाचा विश्वास आहे. अशा परिस्थितीत या १९ विधानसभेच्या जागा यावेळी लोकसभेचे चित्र बदलू शकतात.
 
सलग चार विजयानंतर ओवेसी पाचव्यांदा हैदराबादमधून निवडणूक लढवत आहेत, मात्र यावेळी भाजपने त्यांना कडवे आव्हान दिले आहे. चार वर्षांपूर्वी हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाल्याने उत्साहित झालेल्या भाजपने माधवी लतांच्या रूपाने लढाऊ उमेदवार उभा केला आहे, जो ओवेसींच्या विजयात अडथळा म्हणून उभा आहे. आतापर्यंत ओवेसींचा भारत राष्ट्र समितीशी परस्पर समन्वय होता. पण, राज्याचे चित्र बदलल्याने ओवेसींना आता काँग्रेसची गरज आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसलाही ओवेसींची गरज आहे. कारण, तेलंगण विधानसभेत काँग्रेसकडे बहुमतापेक्षा केवळ चार आमदार जास्त आहेत. साहजिकच, आपले सरकार मजबूत करण्यासाठी रेवंत रेड्डी यांना ओवेसींच्या पाठिंब्याची गरज आहे आणि ओवेसी यांना हैदराबादमधील त्यांच्या पाचव्या विजयासाठी काँग्रेसच्या सहकार्याची गरज आहे.