'धर्म' म्हणजे त्याग, सेवा, समर्पण : प्रा. डॉ. सतीश मोढ

31 May 2024 21:05:02
prof dr satish modh
 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) :     "धर्म म्हणजे त्याग, सेवा, समर्पण. हे तीन गुण स्त्रियांमध्ये जन्मतःच तयार झालेले असतात. मात्र पुरुषांनी हे गुण आत्मसात करण्याची खरी आवश्यकता आहे. असे झाल्यास देशाची ५०% लोकसंख्या निश्चितच सुखी होईल. प्रत्येकाने समरसतेच्या भावनेने कार्य केल्यास उन्नत समाज तयार होईल आणि भारताचे विश्वगुरू होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.", असे प्रतिपादन विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, चेंबुर चे संचालक प्रा. डॉ. सतीश मोढ यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ३०० वे जयंती वर्ष सुरु झाले असून संपूर्ण देशभरात त्रिशताब्दी साजरी होत आहे. मुंबई विद्यापीठ लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र आणि समरसता साहित्य परिषद (महाराष्ट्र प्रदेश) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम शुक्रवार, दि. ३१ मे रोजी सर कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृह, मुंबई विद्यापीठ, फोर्ट येथे संपन्न झाला.


हे वाचलंत का? - मान्सून अखेर केरळात दाखल!; लवकरच राज्यात दाखल होणार


डॉ. सतीश मोढ पुढे म्हणाले, "दोनशे वर्ष होळकरांचे साम्राज्य टिकून होते. ते टिकवण्यात अहिल्यादेवींचे मोठे योगदान आहे. त्यापैकी तब्बल ४० वर्ष अहिल्यादेवींनी स्वतः राज्य केलं. समाजातील प्रत्येक वर्ग हा आपलाच आहे, त्यांच्याशी समरस होऊन त्यांना प्रवाहाच्या मुख्य धारेत आपल्याला आणायचे आहे, ही शिकवण अहिल्यादेवी होळकरांनी दिली. त्यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे आपण चालले पाहिजे."

कार्यक्रमादरम्यान मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. रविंद्र कुलकर्णी, समरसता साहित्य परिषद (महाराष्ट्र प्रदेश) कोषाध्यक्ष धीरज बोरीकर, मुंबई विद्यापीठ प्र कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, मुंबई विद्यापीठ प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ बळीराम गायकवाड, रा. स्व.संघ मुंबई महानगर संघचालक सुरेश भगेरिया, कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवी होळकरांवरील पोवाडाही सादर केला. तसेच दै. मुंबई तरुण भारतच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती विशेष 'शिवयोगिनी लोकमाता' पुरावाणीचे प्रकाशनही करण्यात आले.


महिलांचे सक्षमीकरण हीच त्यांना आदरांजली

महाराष्ट्राच्या भूमीतील ज्या अनन्य साधारण क्रांतिकारकांनी देशहितासाठी कार्य केले, स्वातंत्र्य मिळवण्यात मोठे योगदान दिले त्यांच्यापैकी एक म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवी म्हणजे १८ व्या शतकातील महान व्यक्तिमत्व. राष्ट्राप्रती त्यांनी केलेले समर्पण विसरता येणार नाही. महिला सक्षम झाल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. समाजातील विविध क्षेत्रात महिला नेतृत्व सक्षम होणं हीच अहिल्याबाई होळकरांसाठी खरी आदरांजली ठरेल.
- रमेश बैस, राज्यपाल




Powered By Sangraha 9.0