मान्सून अखेर केरळात दाखल!; लवकरच राज्यात दाखल होणार
31-May-2024
Total Views | 41
पुणे : यंदा मान्सून केरळमध्ये पोहोचल्याची औपचारिक घोषणा हवामान खात्याने केल्याने आगामी काही दिवसात तो महाराष्ट्रात देखील दाखल होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मान्सून हा दरवर्षी ०१ जून नंतर किंवा दरम्यान केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र यावेळी दोन दिवस आधीच तो दाखल झाल्याचे सर्व परिस्थितीचे आकलन केल्यानंतर हवामान खात्याने स्पष्ट केले.
मान्सूनने केरळचा बहुतांश भाग आणि ईशान्येकडील अनेक भाग व्यापला आहे. त्यामुळे पुढील दिवसात तामिळनाडू आणि कर्नाटकचा काही भाग तसेच उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि उर्वरित ईशान्य राज्यांचा समावेश होण्याची शक्यता विभागाकडून वर्तवण्यात आली होती. येत्या दोन दिवसात मान्सून अरबी समुद्राचा भाग व्यापेल. केरळ, लक्षद्वीप, कर्नाटकचा काही भाग, तमिळनाडूचा आणखी काही भाग आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यामध्ये काही भाग पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा राहील. शुक्रवारी (दि.31) वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच भंडारा,गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिलेला आहे. मान्सूनला पुढील वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण तयार आहे. त्यामुळे कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग तो व्यापेल असे डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ, पुणे यांनी सांगितले आहे.
कोकणातील रत्नागिरी पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा असेल, असाही अंदाज दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनूसार शनिवारी आणि रविवारी पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. सोमवारी (दि.3) संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, तसेच कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.