मुंबई (विेशेष प्रतिनिधी) : राष्ट्र सेविका समिती (Samiti Pathsanchalan) वायव्य क्षेत्र (जयपूर) प्रबोध वर्गच्या पथसंचलनाची सुरूवात आग्रा रोडवरील अग्रसेन मार्गावरील अग्रवाल पीजी कॉलेजपासून झाली. देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि. ३० मे रोजी संध्याकाळी आयोजित पथसंचलनात २६० सेविकांनी सहभाग घेतला होता. अग्रवाल कॉलेज, घाटगेट, रामगंज बाजार, बडी चौपार, जोहरी बाजार, सांगणेरी गेटमार्गे हे संचलन अग्रवाल कॉलेज येथे पोहोचले. यावेळी समाजातील विविध गटांनी मार्गावर पुष्पवृष्टी करून पथसंचलनाचे स्वागत केले.
राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सह-शारीरिक प्रमुख वसुधा सुमन यांनी अग्रवाल महाविद्यालयात उपस्थितांना संबोधित केले. त्या म्हणाल्या की, मुलींवर समाजाची दुहेरी जबाबदारी आहे. त्यांना कर्तव्य आणि निष्ठेने दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. त्यातच त्याचा अभिमान आहे. मुली आणि किशोरवयीन मुलींमध्ये मातृत्वाचे गुण विकसित करून राष्ट्र उभारणीत सहभागी व्हायला हवे. ईश्वराने दिलेल्या गुणांचा विकास करून व्यक्तिमत्वाचा विकास करणे म्हणजे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होय. यावेळी क्षेत्र कार्यवाहिका प्रमिला शर्मा, वर्ग अधिकारी नर्मदा इंदोरिया, प्रांत कार्यवाहिका संगीता जांगीड उपस्थित होत्या.