मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar Trishatabdi) यांचे ३०० वे जयंती वर्ष दि. ३१ मे पासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशात अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी साजरी होणार आहे. यासाठी 'लोकमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी समारोह समिती' स्थापन करण्यात आली आहे. या सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन शुक्रवार, दि. ३१ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता अभय प्रशाल, इंदूर येथे होणार आहे. इंदूर महानगरपालिका या भव्य सोहळ्याचे सहआयोजक आहे.
भानपुरा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री ज्ञानानंद जी तीर्थ, श्री श्री १००८ महामंडलेश्वर किरणदासबापू महाराज आणि श्री श्री १००८ महामंडलेश्वर कृष्णवदन जी महाराज यांच्या पवित्र उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल जी, राष्ट्र सेविका समितीच्या मुख्य संचालिका शांताक्का आणि समारोह समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
हे वाचलंत का? : संघ शिक्षा वर्गाच्या समापन समारोहात श्री रामगिरी जी महाराज राहणार उपस्थितकार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून पद्मश्री निवेदिता भिडे (विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी) यांची उपस्थिती असेल. इंदूरचे प्रसिद्ध कलाकार गौतम काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे देवी अहिल्याबाईंवर केंद्रीत संगीतमय सादरीकरणही होणार आहे. कार्यक्रमासाठी इंदूरमधील १० हजारांहून अधिक सामाजिक जाती प्रमुख, कार्यकर्ते आणि विचारवंतांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी चिन्मयी मुळे यांच्या 'लोकमाता अहिल्याबाई होळकर – द क्वीन ऑफ इंडोमिटेबल स्पिरीट' या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचीदेखील यादरम्यान विशेष उपस्थिती असेल.
समितीतर्फे वर्षभरात अनेक कार्यशाळा, चर्चासत्रे, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अहिल्याबाई होळकर यांचे साहित्य भारतातील सर्व प्रमुख भाषांमध्ये प्रकाशित केले जाईल. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्यासह तीर्थक्षेत्रांची छायाचित्रे असलेले कॉफी टेबल बुकही प्रकाशित करण्यात येणार आहे. संगीत, नाटक, चित्रकला आदी ललित कलांच्या माध्यमातून देवी अहिल्याबाईंचे जीवन जनसामान्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. देशातील प्रमुख शहरे आणि विद्यापीठांमध्ये हे कार्यक्रम होतील.