पुणे : राहूल गांधी प्रवासी आहेत. त्यामुळे त्यांचं देशात स्वागत होईल पण घर उभं राहणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेस नेते राहूल गांधी यावेळी रायबरेलीतून रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी शुक्रवारी पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राहूल गांधी हे प्रवासी आहेत. त्यामुळे ते आपल्या जागा बदलत असतात. आपल्या देशात पर्यटकांचं स्वागत केलं जातं. पण त्यांचं कायमस्वरुपी घर उभं राहत नाही. त्यामुळे ते अमेठीमध्ये जात असो किंवा रायबरेलीमध्ये सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - उज्वल निकम यांचा राजीनामा!
तसेच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "हरल्यानंतर काय काय बोलता येईल याबद्दलचे बहाणे आतापासूनच शोधण्यात येत आहेत. ईव्हीएमचा मुद्दा सुप्रीम कोर्टाने निकाली काढला. म्हणून आता आकडेवारीतील तफावतीचा विषय सुरु आहे. त्यामुळे असा गेम खेळण्यापेक्षा लोकांमध्ये जायला हवं, असं मला वाटतं."
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "राजकारणात वैयक्तिक शत्रू कोणीही नाही ही एक गोष्ट मोदींनी आम्हाला शिकवलेली आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे राजकीय विचार त्यागलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा विषयच नाही," असेही ते म्हणाले.