मुंबई : जेष्ठ वकील उज्वल निकम यांनी आपल्या विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. उज्वल निकम यावेळी लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना महायूतीकडून भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
राज्य सरकारने उज्वल निकम यांची राज्यभरातील २९ खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियूक्ती केली होती. यामध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याचाही समावेश होता. दरम्यान, आता त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून राजीनामा दिला असून राज्य सरकारने त्यांचा राजीनामा स्विकारला आहे.
उज्वल निकम हे यावेळी उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे भाजपचे उमेदवार आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हेदेखील यावेळी उपस्थित होते.
उत्तर मध्य मुंबई लोकसभेत यंदा भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे. याठिकाणी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. उज्वल निकम हे पहिल्यांदाच राजकारणात उतरले आहेत. त्यामुळे यावेळीची लढत चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे.