बिगर-मुस्लिम मित्राशी बोलला म्हणून मनव्वरला शाळेतून काढलं

28 May 2024 17:30:04
 Mujaffarnagar
 
लखनौ : मुझफ्फरनगरमधील एका मुस्लिम विद्यार्थ्याने आरोप केला आहे की, त्याला हिंदू मित्र असल्याने शाळेतून काढून टाकण्यात आले. आपला एक हिंदू मित्र असल्यामुळे त्याला वाईट पद्धतीने शिव्या दिल्याचा आरोप या मुस्लिम विद्यार्थ्याने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगरच्या फुलत येथील व्हिजन इंटरनॅशनल अकादमीमध्ये शिकणाऱ्या मनव्वरला एका हिंदू मुलाशी भेटल्यानंतर शाळेतून काढून टाकण्यात आले.
 
मनव्वर या शाळेतील वसतिगृहात राहत होता, तिथे त्याचा मित्र संदीप नुकताच भेटायला आला होता. येथे संदीपची चौकशी केल्यानंतर गार्डने त्याला प्रवेश दिला. त्याचा मित्र १० मिनिटे वसतिगृहात थांबला होता. यानंतर तो निघून गेल्यावर मनव्वरला शाळेतून काढून टाकण्यात आले. शाळेच्या व्यवस्थापनाने या प्रकरणाची चौकशी केली आणि मनव्वारच्या मित्रांचीही चौकशी केली.
  
 हे वाचलंत का? - केजरीवाल यांच्या मंत्र्याने नोकरी मागायला गेलेल्या महिलेचा केला विनयभंग; व्हिडिओ व्हायरल होऊनही कारवाई नाही
 
मनव्वरला भेटायला आलेल्या व्यक्तीचे नाव संदीप असल्याचे समजल्यानंतर त्याला फटकारले आणि शाळेतून काढून टाकले. गैरमुस्लिमांसोबतच्या मैत्रीमुळे शाळेच्या वॉर्डनने अपशब्द वापरल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. विद्यार्थ्याने सांगितले की, शाळेच्या व्यवस्थापनाने त्याच्यावर १०,००० रुपयांच्या चोरीचा आरोपही लावला. यानंतर मनव्वर यांनी यासंदर्भात व्हिडिओ बनवून शाळेवर हे सर्व आरोप केले आहेत.
  
शाळेने सांगितले की, मनव्वर हा वसतिगृहात अनधिकृत व्यक्तींना बोलवायचा, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. वारंवार विनंती करूनही तो मान्य करत नसल्याचे शाळेने सांगितले आणि खोटे बोलून दुसऱ्या व्यक्तीला वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला, त्यामुळे कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, तक्रार आल्यास निश्चितपणे कारवाई करू, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0