पाटणा : बिहारमधील मधुबनी जिल्हा न्यायालयाने मंगळवार, दि.२१ मे २०२४ अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद जफर अन्सारी, मोहम्मद जिब्रिल, मोहम्मद अहमद आणि अख्तर अन्सारी अशी शिक्षा झालेल्या दोषींची नावे आहेत. या सर्वांना २५-२५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मधुबनीच्या हरलाखी पोलीस स्टेशन परिसरात घडली. दि. ५ सप्टेंबर २०२२ रोजी, १६ वर्षीय पीडित मुलगी तिच्या भावासोबत कासेरा गावात जत्रेला गेली होती. काही वेळानंतर पीडित मुलगी जत्रेच्या ठिकाणाजवळील एका शाळेत शौचास गेली. यावेळी मोहम्मद जफर अन्सारी, मोहम्मद जिब्रिल, मोहम्मद अहमद आणि अख्तर अन्सारी तेथे पोहोचल्याचा आरोप आहे.
या सर्व आरोपींनी मुलीला पकडून शाळेच्या छतावर नेले. येथे या सर्वांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. गँगरेपच्या वेळी पीडितेने आरडाओरडा केला तेव्हा आजूबाजूचे लोक जमा झाले. जमाव गोळा झाल्याचे पाहून चारही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. लोकांनी धावत जाऊन जफर अन्सारीला पकडले. जफरला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, मोहम्मद जिब्रिल, मोहम्मद अहमद आणि अख्तर अन्सारी यांचाही या कृत्यात सहभाग होता. पोलिसांनी छापा टाकून एक एक करून तिन्ही आरोपींना अटक केली. दुसऱ्या दिवशी, दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी, जेव्हा पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. हा एफआयआर आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ३७६ (डी) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
मधुबनी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ७ देवेश कुमार यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. बचाव पक्ष व सरकारी वकिलांनी आपापले युक्तिवाद केले. कोर्टाने फिर्यादीने सादर केलेले पुरावे पुरेसे मानले आणि मोहम्मद जफर अन्सारी, मोहम्मद जिब्रिल, मोहम्मद अहमद आणि अख्तर अन्सारी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.