मुंबई : प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणं योग्य नाही, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहूल गांधींना दिले आहे. राहूल गांधींनी पुणे अपघातावरून टीका केली होती. यावर आता फडणवीसांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
"बस चालक, ट्रकचालक, ओला, उबर, ऑटोरिक्षा चालक यांनी चुकून एखादा अपघात झाला तर त्यांना १० वर्षांची शिक्षा होते. पण जर श्रीमंत घरचा मुलगा पोर्श गाडी चालवून दोघांची हत्या करतो तर त्याला निंबध लिहायला सांगितला जातो," अशी टीका राहूल गांधींनी केली होती.
हे वाचलंत का? - "...तर कदाचित हा भयंकर गुन्हा घडला नसता!" प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचा दावा
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "केवळ अशा घटनेचं राजकारण करणं हे राहूल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं योग्य नाही. त्यांनी जर नीट माहिती घेतली असती तर कदाचित असं वक्तव्य त्यांनी केलं नसतं."
"पुण्याच्या घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न करण हे अतिशय निषेधार्ह आहे. या घटनेत पोलिसांनी योग्य कारावाई केली आहे. मात्र, बाल न्याय मंडळांने तो निर्णय घेतला होता. यावर पुन्हा अर्ज करून पोलिसांनी हे प्रकरण बाल न्याय मंडळाकडे आणलं आहे. पोलिसांकडून प्रत्येक गोष्टीवर कारवाई करण्यात येईल," असेही ते म्हणाले.