"...तर कदाचित हा भयंकर गुन्हा घडला नसता!" प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचा दावा

    22-May-2024
Total Views |
 
Sonali Tanpure
 
पुणे : पुणे अपघात प्रकरणातील आरोपी मुलांनी माझ्या मुलाला त्रास दिल्याने त्याला शाळा सोडावी लागली होती. त्यावेळी आरोपीच्या पालकांनी लक्ष दिलं असतं तर हा भयंकर गुन्हा घडला नसता, असा दावा शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी केला आहे.
 
 
 
सोनाली तनपुरेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत पुण्यातील अपघातावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, "संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र, योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही."
 
हे वाचलंत का? -  पुणे अपघातप्रकरणी अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले...
 
"शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण-तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा," असे त्यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, या अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल आणि त्याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे. या प्रकरणाची बालहक्क कोर्टात सुनावणी सुरु असून आरोपी कोर्टात दाखल झाला आहे. याशिवाय आरोपी कुटुंबाचा गँगस्टर छोटा राजनशी संबंध असल्याची माहितीही पुढे आली आहे.