पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या भीषण अपघाताबाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनीच त्याला कार चालवायला दिल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच आपण मद्य प्राशन करत असल्याचे आपल्या वडिलांना माहित असल्याचेही त्याने म्हटले आहे.
शनिवारी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगरमध्ये वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करुन कार चालवली आणि एका दुचाकीला धडक दिली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा तो मुलगा आहे. या घटनेनंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते. मात्र, त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
हे वाचलंत का? - पुणे अपघाताची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल! कठोर कारवाईचे आदेश
यासंदर्भात आरोपीने अनेक खुलासे केले आहेत. ”मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही. माझ्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही नाही. तरीसुद्धा वडिलांनीच त्यांच्या मालकीची पोर्श कार माझ्याकडे दिली. तसेच मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे," अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे.
ही पोर्श कार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बंगरुळूमध्ये तात्पूरती नोंदणी करुन ही कार पुण्यात आणण्यात आली होती. याशिवाय या कारवर नंबर प्लेटही नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आरोपी हा २०० किमी वेगाने रस्त्यावरून ही कार चालवत असल्याची माहितीही पुढे आली आहे.