मुंबई : ते कधीच तोंडावर पडलेत आणि आता तोंडावर आपटतील, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. सोमवारी राज्यात अंतिम टप्प्यातील मतदान सुरु आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर उबाठा गटाकडून टीका करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर शरद पवारांनी एका मुलाखतीत उबाठा गटाचे आरोप फेटाळले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उबाठा गटाला उद्देशून म्हणाले की, ते कधीच तोंडावर पडले आहेत आणि यापुढे आता त्यांची तोंडं फुटतील," असा घणाघात त्यांनी केला.
हे वाचलंत का? - दुपारी १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान? जाणून घ्या आकडेवारी
बोगस मतदार आणण्याच्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, "बोगस मतदार आणण्याची आम्हाला गरज नाही. आज संपूर्ण मतदार महायूतीच्या प्रेमात आहेत. ठाणे हा महायूतीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथले मतदार स्वेच्छेने २० तारखेची वाट पाहात होते. विरोधकांना पराभवाची चाहूल लागल्याने त्यांनी हत्यारं खाली टाकलेली आहेत."
"खरंतर फतवे काढण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. धार्मिक लोकांनी अशी जाहीर वक्तव्य करणं लोकशाहीमध्ये घातक आहे. परंतू, यावेळी दुर्दैवाने असे फतवे निघाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन पुढे जात आहोत आणि या विकासाचे लाभार्थी हिंदू, मुस्लीम सगळेच असतील. जो कुणी महाराष्ट्रात जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना महाराष्ट्राची जनता थारा देणार नाही. या निवडणूकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवतील. गेल्या दोन वर्षांत आम्ही मुंबईत केलेलं काम आणि इथे झालेला बदल यामुळे मुंबईच्या सहाही जागांवर महायूतीचे उमेदवार निवडून येतील," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.