भाजपला मिळणाऱ्या जागांविषयी इंडी आघाडीचे वेगवेगळे सूर

केजरीवाल आणि अखिलेश यादव यांचे आकडे भिन्न

    16-May-2024
Total Views |
Indi Aghadi on bjp

नवी दिल्ली:
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला किती जागा मिळणार याविषयी इंडी आघाडीचे दोन प्रमुख नेते – अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांनी वेगवेगळे आकडे सांगितले आहेत. त्यामुळे इंडी आघाडीलाच आपल्या विजयाविषयी खात्री नसल्याची चर्चा रंगली आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी समाजवादी पक्षाचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोहत लखनऊ येथे संयुक्त पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी केजरीवाल म्हणाले, गेल्या चार-पाच महिन्यांपासून भाजप ४०० पारचा नारा देत आहे, मात्र हे वास्तव नाही.

देशभरातून येणाऱ्या ट्रेंडनुसार भाजपला २५० पेक्षाही कमी म्हणजे केवळ २२० जागा मिळतील. त्यामुळे देशात ४ जूननंतर इंडी आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.त्याचवेळी याच पत्रकारपरिषदेत सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी मात्र वेगळाच आकडा सांगितला. ते म्हणाले, यावेळी देशातील १४० कोटी जनता त्यांना (भाजप) केवळ १४० जागाच देणार आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाबमधील ९९ जागांमध्ये त्यांना मोठा धक्का बसणार असल्याचे ते म्हणाले.एकाच पत्रकारपरिषदेत इंडी आघाडीच्या दोन्ही नेत्यांनी वेगवेगळा सूर लावला आहे. त्याचवेळी भाजपने ४०० पार होणारच असा विश्वास वेळोवेळी व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तर आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यांमध्येच भाजपने २८० जागांवर विजय प्राप्त केल्याचे सांगितले आहे.