पुर्वी भारतात गरीबी निर्देशांकाची होती आता वीआयएक्स निर्देशाकांची चर्चा होते - निर्मला सीतारामन

विकसित भारत २०४७ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विकसित भारताचे व्हिजन मांडले

    15-May-2024
Total Views |

Nirmala Sitharaman
 
 
मोहित सोमण: काल बीएसई सभागृह मुंबई येथे बहुप्रतिक्षित ' विकसित भारत २०४७' हा कार्यक्रम पार पडला आहे. निवडणूकीचा धाकधूकीतही वेळ काढत या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या. त्यांच्याखेरीज भाजपा महाराष्ट्राच्या विशेष संपर्क प्रमुख शायना एन सी, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, 'नरेंद्र मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील व भारताच्या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करतील ' असे प्रतिपादन उपस्थित श्रोत्यांना यावेळी केले आहे. विकसित भारतासाठी सरकारचे काय व्हिजन आहे यावर निर्मला सीतारामन यांनी विस्तृत भाष्य केले.
 
बीएसईचे सुंदररमन यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे गेल्या १० वर्षातील अर्थव्यवस्थेसाठी केलेल्या उपक्रमाबद्दल आभार मानले. निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्यांवर भाष्य केले ज्यामध्ये त्यांनी भारतातील कॅपिटल मार्केटचे भारताच्या अर्थव्यवस्थेतील योगदान अधोरेखित केले. त्या म्हणाल्या,
 
'आज भारतीय अर्थव्यवस्थेत झालेली बदल आपण पाहत आहोत आकडेच खूप काही बोलून जातात.' असे म्हणत गेल्या काही वर्षांत झालेल्या प्रगतीचा पाढा त्यांनी वाचला.
 
आज बीएसई जगातील क्रमांक ४ चे इक्विटी मार्केट आहे. या बाजारातील आर्थिक उलाढालीमुळे आर्थिक व्यवस्थेत मोठा बदल झाला. याला सरकारी धोरणांची व पारदर्शकतेची साथ मिळाल्याने भारतात मोठे परिवर्तन झाले ' असे सीतारामन यांनी म्हटले आहे.'शेअर बाजारात पारदर्शकतेबरोबर विकसित तंत्रज्ञानामुळे बाजारात लक्षणीय वृद्धी झाली 'असे यावेळी सीतारामन यांनी नमूद केले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अर्थव्यवस्था क्रमांक पाच वर पोहोचली होती. याला दुजोरा देत सीतारामन म्हणाल्या,'सरकारने प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत बदल घडले. सरकारने केवळ विकास नाही तर प्रत्येक समुहाच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न केले. देशातील गरीबांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली प्राथमिक मदत करणे हे सरकारने आद्यकर्तव्य समजत काम केले व यापुढेही भारताचे हे लक्ष्य असेल' असे उद्गार त्यांनी यावेळी काढले आहेत.
 
औद्योगिक प्रगतीत आवश्यक असणारे भांडवल शेअर बाजारातून मिळत असल्याने खूप मोठा फायदा अर्थव्यवस्थेत झाला.पूर्वी भारताच्या गरीबी निर्देशांकांची अथवा ह्यूमन इंडेक्सची चर्चा भारतात होत असे आज भारतात वीआयएक्स निर्देशांकावर चर्चा होत आहे. हे परिवर्तन खूप महत्वाचे आहे ' असेही आत्मविश्वासाने सीतारामन कार्यक्रमात प्रेक्षकांना उद्देशून म्हणाल्या.
 
त्यांनी भारताच्या विचारातील परिवर्तनदेखील अधोरेखित केले. 'पूर्वी भारत म्हणजे पोस्ट ऑफिस अथवा बँकेत पारंपारिक बचत अशी भारताची ओळख होती मात्र आज मोठ्या प्रमाणात भारत गुंतवणूकीचे इतर पर्यायाला प्राधान्य देत आहेत. भारतात काही वर्षांपूर्वी केवळ दोन कोटी लोकांचे डिमॅट खाते होते आज १५ कोटी लोकांचे डिमॅट खाते आहे हा मोठा बदल आहे असे त्या आवर्जून म्हणाल्या.
 
याविषयी अधिक बोलताना त्यांनी, 'गुंतवणूकीचे महत्व मोठे असताना भारतातील अनेकांना भारतातील पारदर्शकतेवर विश्वास निर्माण झाल्याने बाजाराकडे अनेक लोक वळले आहेत ते वळण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील अर्थव्यवस्थेबाबत लोकांचा वाढलेला विश्वास ' असे सीतारामन अर्थव्यवस्थतेतील बदलाबाबत बोलताना म्हणाल्या.
 
भारतातील कुठलीही गुंतवणूक घ्या बाँड मार्केट, आयपीओ, म्युच्युअल फंड गुंतवणूक सगळ्या प्रकारात गुंतवणूकीत मोठी वाढ झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याबाबत त्यांनी बीएसईला सेबीशी संलग्न होत पारदर्शकतेने हातात हात घालून काम करा असा सल्ला देखील यावेळी दिला. याविषयी बोलताना सीतारामन म्हणाल्या, ' शेवटी समाजाचा बाजारातीऋ विश्वास महत्वाचा आहे. तो जपणे अत्यावश्यक असल्याने जे जपणे महत्वाची गोष्ट ठरणार आहे.' असे पुढे म्हणाल्या.
 
आम्हाला विश्वास आहे आगामी काही वर्षांतच भारत क्रमांक तीनची अर्थव्यवस्था होणार आहे. आम्हाला असाही विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील.' असे सीतारामन आपल्या व्हिजन बाबत बोलताना म्हणाल्या. यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्व स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, ' जागतिक पातळीवरील चढ उतार होत असताना भारतीय कॅपिटल मार्केटने उत्तम काम केले. बाजारातील इक्विटी मजबूत स्थितीत ठेवण्यास भारतीय बाजाराने मदत केली असे त्या म्हणाल्या.
 
'भारतीय बाजाराने घेतलेले निर्णय अभूतपूर्व होते. विदेशी शेअर बाजारात देखील टी + ० ची सेटलमेंट प्रणाली आली नाही ती भारताने करून दाखवली हे आपले यश आहे. भारत इतक्यावरच थांबणार नाही परंतु आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून गुंतवणूकीत परिवर्तन आणायचे आहे. झालेला पारदर्शक बदल हा तंत्रज्ञानाने शक्य झाला असल्याने आगामी काळात भारतात प्रो अँक्टिव्ह रहावे लागेल असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.
 
भारतातील अर्थव्यवस्थेबाबत त्यांनी सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा मंत्र देत आगेकूच करण्याचा सल्ला तरूण पिढीला दिला. 'भारतातील ९५ कोटी जनता काम करणारी असल्याने भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले. विकसित भारत हे आपल्या सगळ्याचे लक्ष असून भारताच्या महत्वाच्या १४ क्षेत्रात व इतर क्षेत्रातही भारत हा वेगाने घोडदौड करेल असा विश्वास आहे ' असे सीतारामन यांनी म्हटले आहे.
 
भाषणाची सांगता झाल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी उपस्थितांचा प्रश्नाला उत्तरे देखील दिली. महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेमक्या भाषणाने कार्यक्रमाचा शेवट झाला. निर्मला सीतारामन यांनी अखेरीस भारताच्या यशोगाथेत सगळ्यांनी सहभागी व्हा असा मूलमंत्र त्यांनी यावेळी दिला आहे.