बाबा, सांगा ना?

    14-May-2024   
Total Views |
Political position of the UBT
 
भाजपचे सरकार डोक्यावर बसल्यास घरोघरी सीसीटीव्ही लावतील. मटण खायचे की भाजी, तेच सांगतील, असे मी म्हणजे तुमचा आदूबाळराजे म्हणतो. आपल्या मॅडम, आपले बारामतीचे साहेब जे जे म्हणतात ना, तेच म्हणालो. जसे भाजपला संविधान बदलायचेय, मुंबई तोडायची आहे, भाजपला लोकशाही नको वगैरे वगैरे. लोकांची पण कमाल आहे. आपण त्यांच्या जिवावर इथे दुसरी ‘मातोश्री’ बांधली आणि आवाज कुणाचा म्हणणारे ते कार्यकर्ते मुंबईतली घरे विकून मुंबईबाहेर गेले. जाऊ दे. आपले नवीन मतदार आहेत ना? सलामलेकुम! हे म्हणून बघितलं कसे वाटते ते. आपल्याला पण ‘लंबी रेस का घोडा’ बनायचे आहे. अगदी पवार आजोबांसारखे. हो आणि आपल्या हायकमांड मॅडमच्या विचारांनी आपण वागायलाच हवे. ‘बाटला हाऊस’च्या वेळी किती रडल्या होत्या. बाबा, त्या कसाबने मुंबईवर हल्ला केला, तेव्हा आपण कुठे होतो हो? पवार आजोबा १३ बॉम्बस्फोट असे जे आपल्या लोकांसाठी बोलले, तेव्हा आपण कुठे होतो? हो तो मुंबईला २००५ साली पूर आला होता. तेव्हा आपण कुठे होतो? हं मी लहान होतो. पण, तुम्ही पण लहान होतात का? बाबा, आपण महाराष्ट्र मुंबईच्या संकटकाळात कुठेच नव्हतो, पण तरीही आपले कार्यकर्ते आपल्याला ‘लाईक’ करतात. बाबा, ‘लाईक’वरून आठवले की, तुम्ही कोरोनाकाळात ‘फेसबुक लाईव्ह’ करायचात. हं त्यावेळी मी कुठे होतो बरं? छे, तेही आठवत नाही. हा विषयच सोडून देऊ, नाहींतर राण्यांचा नितेश पुन्हा सगळं आठवायला लावेल. तर बाबा, सत्तेत आल्यावर भाजपवाले मटण खायचे की भाजी, हे सांगतील असं म्हणताना, मी राजकाकांना कसे विसरलो? मटण आणि भाजी म्हटल्यावर राजकाका पुन्हा तळलेले वडेबिडे प्रकरण काढतील का? झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणताय का बाबा, ओके. हे कोण म्हणाले की, मूठ झाकली तरी आता मुठीत लपवणार तरी काय काय? दिशा, सुशांत, मनसुख कोरोना काळ, साधू हत्याकांड!! असू दे हे कितीही खरं असले तरी आमच्याकडे ब्रह्मास्त्र आहे. मराठी-गुजराती भेदभाव, खोटंच म्हणायचे ‘संविधान खतरे में’ सारखंच म्हणायचं की, मुंबई महाराष्ट्रपासून तोडणार! बरोबर ना बाबा! बाबा, पण हे कोण म्हणतेय की, आपल्या बुडाखाली झालेला हिरवा अंधारच भगव्या सूर्यप्रकाशात ‘कमळ’ फुलवणार आहे. बाबा, खरंच का अब की बार पुन्हा मोदी सरकारच! बाबा सांगा ना!

‘कमळ’ उमलले की...


राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारला का, असे काहीसे शरद पवार मागे म्हणाले होते. आता तेच शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण एकत्र आलेत. स्वप्नांवर कुणाचीच बंदी नसते. रस्त्याचा भिकारीही जगद्सम्राट व्हायचे स्वप्न पाहू शकतो. त्यामुळे भाजपला साधे बहुमत मिळणेही अवघड असून, महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागा मिळतील, हे स्वप्न पृथ्वीराज पाहू शकतात. राज्यात मविआच्या ३२ ते ३५ जागा निवडून येतील, असे पृथ्वीराज चव्हाणांपासून एकजात सगळ्या महाविकास आघाडीला वाटते. यामागचे कारण या सगळ्या नेत्यांचे आयुष्य राजकारणात गेले. या नेत्यांनी निवडणुकीच्या राजकारणात हिंदू मतांचे विभाजन आणि मुस्लीम मतदारांची निर्णायक एकगठ्ठा मते असेच दृश्य पाहिले. त्यानंतर त्यांनी २०१४ आणि २०१९ साली भाजपने त्यातही नरेंद्र मोदींनी सत्तेच्या संविधानात्मक माध्यमातून हिंदूंवरचे शेकडो वर्षांचे धार्मिक-सांस्कृतिक आक्रमण चेचून टाकले, हे पाहिले. त्यामुळे हिंदूंचेही एकगठ्ठा मते असतात. ते मोदींसाठीच असते आणि भाजपला जाते, हेसुद्धा याच नेत्यांनी पाहिले. त्यांना वाटले, देशात मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस असताना महाराष्ट्रात सत्तेत येणे शक्य नाही. मग, ब्राह्मण विरुद्ध मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध मागासवर्गीय समाजाला लढवण्याचे षड्यंत्र रचले गेले. जातीनिहाय जनगणना आणि ‘जितनी जिसकी आबादी उतना उसका हक...’ हे पृथ्वीराज चव्हाणांचे नेते राहुल गांधी काय उगीच म्हणताहेत का? सगेसोयरे, सगेसोयरे म्हणत उगीचच महाराष्ट्रात धरसोडीचे उपोषण होतेे का? हे सगळे प्रयोग केवळ हिंदू समाजाला जातीपातीमध्ये पुन्हा वाटण्यासाठी झाले. तर, पृथ्वीराज चव्हाणांपासून ते महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याला या प्रयोगाच्या यशाची खात्री आहे. त्यांना वाटते की, हिंदू पुन्हा विभागला गेला. आता ते हिंदुत्व, राष्ट्रीयत्व विसरून पुन्हा निष्क्रिय होतील. त्यामुळे महाविकास आघाडीला ३२-३५ जागा मिळतील. पण, महाविकास आघाडीचा हा भ्रम आहे. जो नाही रामाचा तो नाही कामाचा, हे जगभरातल्या हिंदूंनी मान्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशातही प्रभू श्रीरामांच्या चरणी एकत्र येत हिंदू मतदार ‘कमळ’च वाहतील! ‘कमळ’ उमलले की कोण सत्तेवर येईल, हे काय सांगायला हवे?
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.