भारतात खिलाफत स्थापन करण्याचा होता कट; जहाँजैब वानी आणि त्याच्या बायकोला मिळाली २० वर्षांची शिक्षा

    10-May-2024
Total Views |
 NIA
 
नवी दिल्ली : एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिल्लीतील पाच इसिस दहशतवाद्यांना ३ ते २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हे सर्व दहशतवादी इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांताचे (आयएसकेपी) सदस्य होते आणि ते भारतात दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते. जहाँजैब सामी वानी असे यातील मुख्य आरोपीचे नाव असून तो श्रीनगरचा रहिवासी आहे. त्याची पत्नी हिना बशीर शेखही त्याच्या सर्व गैरकृत्यांमध्ये त्याच्यासोबत होती.
 
वृत्तानुसार, एनआयएला त्यांच्या तपासात आढळून आले की काश्मिरी दहशतवादी जोडप्याच्या नेतृत्वाखाली भारतात १०० हून अधिक ठिकाणी आयईडी स्फोटांची योजना बनवली जात होती. त्यासाठी बिटकॉईनसारख्या अभासी चलनाचा वापर केला जात होता. हा गट आयएसआयएस ची शाखा म्हणून काम करणाऱ्या आयएसकेपी शी संबंधित आहे.
 
एनआयए कोर्टाने शिक्षा सुनावलेल्या पाच दहशतवाद्यांमध्ये जहांजैब सामी (३६) हा श्रीनगरचा रहिवासी आहे. त्याला दाऊद इब्राहिम, झैब, अबू मोहम्मद अल-हिंद आणि अबू अब्दुल्ला अशा नावांनीही ओळखले जात होते. याशिवाय त्याची काश्मिरी पत्नी हिना बशीर शेख, हैदराबादच्या अब्दुल्ला बासित, पुण्याच्या सादिया अन्वर शेख आणि नबील सिद्दीक खत्री यांचा समावेश आहे.
 
एनआयए न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंदर जीत सिंग यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही संस्थेला चालवण्यासाठी पैशांची गरज असते, जी या प्रकरणात बिटकॉइनसारख्या उच्च-तंत्रज्ञानाच्या चलनातून पूर्ण होते. अशा परिस्थितीत आपण काय करत आहोत आणि किती गंभीर गुन्हा करत आहोत हे सर्वांनाच माहीत होते. त्यामुळे त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
 
 
एनआयएने सांगितले की, पाच आरोपींपैकी एकावर भारतात खिलाफत स्थापन करण्याची योजना आखल्याचा आरोप आहे आणि त्याच्यावर एकाच दिवसात १०० आयईडी स्फोट घडवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. दि. ८ मार्च २०२० रोजी, दिल्ली पोलिसांनी ISKP शी संबंध असल्याच्या आरोपाखाली दोन आरोपींना अटक केली – जहांजैब सामी वानी आणि त्यांची पत्नी हिना बशीर बेग यांना ओखला विहार, जामिया नगर, दिल्ली येथून. दोघेही भारतात देशविरोधी कारवाया करण्याचा कट रचत होते. याशिवाय दि. १२ जुलै २०२० रोजी एनआयए ने पुण्यातून आणखी दोन आरोपींना अटक केली. सादिया अन्वर शेख आणि नबील एस खत्री अशी त्यांची नावे होती.
 
या प्रकरणी अब्दुर रहमान उर्फ डॉ. ब्रेव्ह याला एनआयए ने ऑगस्ट २०२० मध्ये अटक केली होती. सध्या अब्दुर रहमानविरुद्ध खटला सुरू आहे. अब्दुर रहमान हे बंगळुरूमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता, अशी माहिती जारी करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. त्यानंतर तो इतर आरोपींच्या संपर्कात आला आणि त्यांनी त्याला कट्टरपंथी बनवले. एवढेच नाही तर अब्दुल २०१३ मध्ये सीरियालाही गेला होता. जिथे तो आयएसआयएस च्या इतर दहशतवादी कारवायांमध्येही सामील होता.