मुंबई : संजय राऊत खासदारकी वाचवण्यासाठी लोकसभेनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊतांनी शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊत पुढच्या राज्यसभेमध्ये असणार का? की त्याआधीच ते शिंदे गटात जाणार. आमच्या माहितीनुसार स्वत:ची खासदारकी वाचवण्यासाठी संजय राऊत लोकसभेनंतर कदाचित शिंदेंच्या शिवसेनेत दिसेल."
हे वाचलंत का? - ब्रेकिंग न्यूज! काँग्रेस प्रवक्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
तसेच राज ठाकरेंच्या महायूतीत येण्यावरही संजय राऊतांनी टीका केली होती. यावर बोलताना राणे म्हणाले की, "राज साहेबांना राऊतांपेक्षा जास्त राजकारण कळतं. त्यांना हिंदूत्वाचं महत्त्वही यांच्यापेक्षा जास्त कळतं. त्यामुळे राज ठाकरे जी भूमिका घेतील ती हिंदुत्वाच्या हिताचीच असेल," असे ते म्हणाले.
"संजय राऊत भांडूपमध्ये बसून रोज हळूहळू उबाठा संपवत चालले आहेत. काँग्रेस, शरद पवार गट, प्रकाश आंबेडकर यापैकी कुणीही त्यांना जवळ करत नाहीत. उबाठा गट सोडणारा प्रत्येक नेता आज संजय राऊतांना शिव्या घालतात. ज्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं नाव खिचडी चोरीमध्ये आलेलं आहे ते भाजपच्या नेत्यांना खंडणीखोर नाव देतात, हे हास्यास्पद आहे," असेही ते म्हणाले.