मुंबई : पाँडिचेरी विद्यापीठात नुकत्याच घडलेल्या वादग्रस्त नाटकाच्या वादानंतर आता आयआयटी बॉम्बेमध्ये (IIT Bombay Controversy) हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. काही दिवसांपूर्वी आयआयटी बॉम्बेच्या ओपन थिएटरमध्ये 'राहोवन' नावाचे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकात प्रभू रामाची खिल्ली उडवली असून संपूर्ण रामायण हे अश्लील आणि अपमानास्पद पद्धतीने दाखवल्याचे समोर आले आहे.
आयआयटी बॉम्बेच्या नुकत्याच झालेल्या सांस्कृतिक महोत्सवादरम्यान 'परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिव्हल'चा एक भाग म्हणून 'राहोवन' नावाचे नाटक सादर करण्यात आले होते. रामायणावर आधारित या नाटकाने प्रभू श्रीराम आणि संपूर्ण रामायणावर खालच्या पातळीवर जाऊन खिल्ली उडवल्याते दिसते आहे. या कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले असून कलात्मक स्वातंत्र्य विरुद्ध धार्मिक भावना या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.
नाटकातील पात्रांची नावे बदलली असून रामाचे नाव राया, सीतेचे नाव भूमी आणि रावणाचे नाव अघोरा ठेवण्यात आली होती. राम आणि सीता एकमेकांवर शारीरिक हल्ला करत आहेत, रावणाने केलेल्या अपहरणामुळे सीता लंकेत आनंदी असून त्याची स्तुती करत आहे, लक्ष्मण आणि सीता एकमेकांशी अश्लील संवाद करत आहेत, अशा बऱ्याच गोष्टी यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी आयआयटी बॉम्बेमध्ये घडलेल्या प्रकारावरून संताप व्यक्त केला असून नाटकाचे लेखक, दिग्दर्शिक आणि अभिनय करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.