'सत्ता मिळवा, मलई खा' हीच इंडी आघाडीची कार्यपद्धती

08 Apr 2024 19:50:10
pm modi in chandrapur
 

मुंबई :    "२०२४ ची लोकसभा निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरतेची आहे. एकीकडे 'एनडीए'चे ध्येय हे देशासाठी मोठे निर्णय घेण्याचे आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडी आघाडीचा हेतू हा सत्ता मिळवून मलई खाण्याचा आहे. काँग्रेसप्रणित आघाडीने देशाला नेहमी अस्थिरतेकडे नेले. त्यामुळे स्थिर सरकार का गरजेचे असते, हे महाराष्ट्राहून चांगले कुणास ठाऊक असेल?" असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, उद्या गुढीपाडव्यानिमित्त नवे पर्व सुरू होत आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेला गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा.


हे वाचलंत का? -   विरोधकांकडून फक्त कुटुंबाचा विकास!


राज्याच्या विकासासाठी स्थिर सरकार किती आवश्यक असते, हे महाराष्ट्राशिवाय आणखी कुणाला जास्त समजणार? जोपर्यंत देशात त्यांचे (इंडी आघाडी) सरकार होते, तोवर महाराष्ट्राची उपेक्षाच होत राहिली. इंडी आघाडीतील नेत्यांनी जनादेशाचा अनादर करीत राज्यातील सत्ता मिळवली खरी; पण या लोकांनी आपापल्या घराण्याचा विकास केला. कोणाचा किती हिस्सा असेल, कुठले कंत्राट कुणाला मिळेल, मलाईदार खाते कुणाकडे असेल, याहिशोबाने त्यांनी सत्ता राबवली. महाराष्ट्रात विकासाचा कुठलाही प्रकल्प आला, तर आधी कमिशन आणा, नाहीतर कामाला ब्रेक लावू; असे धोरण त्यांनी अवलंबले, असा घणाघात मोदी यांनी केला.

जेव्हा महाराष्ट्रात नवीन विमानतळ बनवण्याचा विषय आला, तेव्हा इंडी आघाडीच्या नेत्यांनी आधी कमिशन मागितले. जलयुक्त शिवार योजना बंद केली. विदर्भातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या समृद्धी महामार्गाला विरोध केला. मुंबई मेट्रो, कोकणातील रिफायनरीही रोखली. पंतप्रधान आवास योजनेचे पैसे पाठवले, तरी कमिशनसाठी गोरगरिबांना घरे देण्यापासून रोखले. आमचे सरकार सत्तेत येताच आम्ही सर्व योजनांना पुन्हा गती दिली. रात्रंदिवस हे सरकार काम करीत आहे. हेतू स्वच्छ असला, की निकालही चांगला लागतो, असेही पंतप्रधान म्हणाले.


काँग्रेसच्या जाहिरनाम्यात मुस्लीम लीगची भाषा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसच्या जाहिरनाम्यात मुस्लीम लीगची भाषा वापरली आहे. इंडिया आघाडीचे लोक दक्षिण भारताला स्वतंत्र करण्याची भाषा करीत आहेत. 'सनातन धर्म डेंग्यू आहे', असे काही नेते म्हणतात. काँग्रेस नकली शिवसेनेला सोबत घेत, त्याच नेत्यांना मुंबईत आणून सभा घेते. काश्मीर हा भारताचा भाग आहे. काश्मिरी पंडितांची घरे जाळली जात होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी उघडपणे काँग्रेसविरोधात भूमिका घेतली होती. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष पूर्ण ताकदीने पुढे घेऊन जात आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


आता गडचिरोलीची ओळख पोलादाचे शहर

देशाचे विभाजन कुणी केले? काश्मिरचा प्रश्न कुणी प्रलंबित ठेवला? दहशतवाद कुणामुळे निर्माण झाला? बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतरत्न पुरस्कारापासून कोणी वंचित ठेवले? असे अनेक सवाल उपस्थित करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसप्रणित इंडी आघाडीवर शरसंधान साधले. ते म्हणाले की, आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात नक्षलवाद कमजोर पडला आहे. गडचिरोली आता पोलादाचे शहर म्हणून ओळखले जात आहे. 'कडू कारले साखरेत घोळा किंवा तुपात तळा, ते कडूच राहणार', या म्हणीचा संदर्भ देत पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

 
Powered By Sangraha 9.0