नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी बीआरएस नेत्या के कविता यांना न्यायालयाकडून जामीन नाकारण्यात आला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने के कविता यांना जामीन नाकारले असून ईडीकडून त्यांच्या जामीनाला विरोध करत या प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, के कविता यांनी मुलाच्या परीक्षेच्या आधारावर जामीनासाठी अर्ज केला होता.
सीबीआयच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी जामीन याचिकेवर सुनावणी करताना सदर निर्णय दिला आहे. दि. ०८ एप्रिल रोजी न्यायालयाने राखीव ठेवलेला निर्णय जाहीर केला. दरम्यान, दि. ०९ एप्रिल रोजी न्यायालयीन कोठडी संपत असून वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी ही याचिका दाखल केली आहे.
हे वाचलंत का? - दिल्ली मद्य घोटाळा : केजरीवाल यांच्या अडचणी वाढ, आता पीएची चौकशी होणार!
न्यायालयात युक्तिवाद करताना के कविता यांनी पुढील महिन्यापासून आपल्या मुलाच्या परीक्षा सुरू होत असून या कालावधीत त्याच्यासोबत राहणे आवश्यक असल्याचे सांगत कोर्टाकडे दिलासा मागितला होता. जामिनासाठी त्यांनी पीएमएलए कायद्यातील काही नियमांचाही आधार घेतला होता. मुलाच्या तयारीत आपली जागा कोणीही घेऊ शकत नाही, असे कविता यांनी न्यायालयात सांगितले.
सुनावणीदरम्यान ईडीने कोर्टात म्हटले की, पीएमएलए कायद्यात महिलांसाठी सवलतीची तरतूद आहे, परंतु कविता यांना सामान्य महिला मानले जाऊ शकत नाही. त्या सामान्य महिला नसून मोठ्या राजकारणी असल्याचे ईडीने म्हटले आहे. असे सांगत ईडीने न्यायालयात त्यांच्या जामिनाला विरोध केला.
पुढे ईडीने सांगितले की, “या प्रकरणात के कविता लाचखोरी प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. त्यांनी केवळ लाच दिली नाही तर इंडोस्पिरिट्सच्या माध्यमातून या प्रकरणाचा फायदाही घेतला आहे. आम्ही फक्त विधानांवर विश्वास ठेवत नसून या प्रकरणातील सर्व पुरावे, व्हॉट्सॲप कागदपत्रे आमच्याकडे आहेत. या प्रकरणात, त्या खात्यांमधून व्यवहार झाले आणि या व्यवहारांत त्या लाभार्थी आहेत, असेही ईडीने न्यायालयाला सांगितले.