नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्यात ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांची आता सक्तवसुली संचालनालया(ईडी)कडून चौकशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर, सदर घोटाळा प्रकरणी ईडीकडून आप आमदार दुर्गेश पाठक यांनाही समन्स बजावण्यात आले आहेत.
दरम्यान, ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या स्वीय सचिवाची दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात चौकशी करण्यात येत आहे. ईडीकडून सांगण्यात येत आहे की, दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असून काही बाबींवर तपास यंत्रणेला स्पष्टीकरणही हवे आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीकडून बिभव कुमारची चौकशी केली आहे.
हे वाचलंत का? - भारताचा अपमान करणाऱ्या पोस्टनंतर मंत्र्याकडून जाहीर माफी!
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आप राजेंद्र नगर आ. दुर्गेश पाठक यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. पाठक यांना दि. ०८ एप्रिल २०२४ रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. पाठक चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले असून पाठक हे 'आप'च्या राजकीय घडामोडींच्या निर्णय समितीचे ज्येष्ठ सदस्य आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल सध्या दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.
सुप्रीम कोर्टाकडून संजय सिंह यांना दिलासा नाही
सर्वोच्च न्यायालयाने आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. गुजरातमध्ये दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दिलासा मागत याचिका दाखल केली होती. सदर प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवर प्रश्न उपस्थित करण्याशी संबंधित आहे. प्रकरणात बजावलेल्या समन्सला स्थगिती देण्याची मागणी करतानाच आता गुजरातमधील न्यायालयाने समन्स बजावले आहेत. यांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.