राज ठाकरेंच्या महायूतीत येण्याबद्दल फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले, "यावेळी मनसे..."

08 Apr 2024 15:21:00

Devendra Fadanvis 
 
नागपूर : यावेळी राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायूतीसोबत राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने ते महायूतीत सामील होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, याबाबत आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गेल्या काळात आमची मनसेशी काही चर्चा झाली आहे. विशेषत: जेव्हापासून मनसेने हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. तसेच राज ठाकरे हे २०१४ साली मोदीजींना समर्थन देणारे पहिले व्यक्ती होते. मोदीजींनी पंतप्रधान बनवावं अशी जाहीरपणे त्यांनी भूमिका घेतली होती. मधल्या काळात त्यांनी काही वेगळी भूमिकादेखील घेतली. पण ज्याप्रमाणे मोदीजींनी १० वर्षात भारताचा विकास केला ते पाहता सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं असं राज ठाकरेंनादेखील मान्य असेल."
 
हे वाचलंत का? -  राऊत, 'हे' युतीधर्माला शोभतं का? विशाल पाटलांचा सवाल
 
"विशेषत: जे लोकं राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आहेत त्या सर्वांनी मोदीजींसोबत राहायला हवं. त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायूतीसोबत राहील, असा मला विश्वास आहे. पण त्यांचा पक्ष आहे आणि त्यांना निर्णय घ्यायचा आहे. पण यावेळी त्यांनी मोदीजींना पाठींबा द्यायला हवा, अशी माझी अपेक्षा आहे," असे ते म्हणाले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, "मोदीजींवर विश्वास ठेवून कुणीही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असेल तर त्याला कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही. याबाबत पक्षाने अजून आम्हाला अधिकृतरित्या कळवलेलं नाही. पण ज्यावेळी आम्हाला पक्ष कळवेल त्यावेळी आम्ही त्यांचं स्वागतच करु," असे ते म्हणाले. तसेच महायूतीतील उर्वरित जागांची एकत्रित घोषणा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, ९ तारखेला राज ठाकरेंची शिवतीर्थावर सभा होणार आहे. या सभेमध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0