जालना : राज्यात सध्या लोकसभा निवडणूकांची जोरदार तयारी सुरु आहे. बहुतांश जागांवर उमेदवार जाहीर झाले असून त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, सध्या त्यांच्या विरोधात उमेदवारच नसल्याचे चित्र दिसत आहे.
भाजपचे रावसाहेब दानवे यांना महायूतीकडून जालना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांनी याठिकाणी प्रचारालाही सुरुवात केली आहे. परंतू, अजून त्यांच्याविरोधात उमेदवारच निश्चित झालेला नाही. महाविकास आघाडीकडून जालना लोकसभेचा उमेदवार अद्याप घोषित करण्यात आलेला नाही.
हे वाचलंत का? - वंचितला मोठा दणका! 'या' उमेदवाराला सोडावे लागणार मैदान
रावसाहेब दानवे हे सलग पाचवेळा जालना लोकसभेतून विजयी झाले आहेत. त्यानंतर यावेळीही त्यांना भाजपने सलग सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, पारंपारिकरित्या जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस निवडणूक लढवत आलीये. पण प्रत्येकवेळी होणाऱ्या पराभावामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि उबाठा गट आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय जालना लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून सध्या काँग्रेसचे माजी आमदार कल्याणराव काळे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. पण अजूनही याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसल्याने इथे सध्या रावसाहेब दानवेंच्या विरोधात कोणताही उमेदवार नाही.