काँग्रेस नेत्यांचे हेमा मालिनींबद्दल आक्षेपार्ह विधान; कंगनाची काँग्रेसवर टीका!

    04-Apr-2024
Total Views |
Randeep Surjewala On Hema Malini

नवी दिल्ली : काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी काही दिवसांपुर्वी भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले. जनतेला संबोधित करताना ते म्हणाले की, जनतेचा आवाज उठवण्यासाठी आमदार, खासदरांना निवडून दिले जाते. ते काही हेमा मालिनी नाही, जिला XXXXXXXX बनवले जाईल. रणदीप सुरजेवाला यांनी दि. १ एप्रिल रोजी हरियाणातील कैथल येथे आयोजित कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना हे वक्तव्य केले होते. ते इंडी आघाडीचे उमेदवार सुशील गुप्ता यांच्या समर्थनार्थ बोलत होते.तसेच आपण आक्षेपार्ह विधान केल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी सारवासारव केली. ते म्हणाले की, “आम्ही हेमा मालिनीचाही आदर करतो कारण त्यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्याने आमची सून आहे. त्यामुळे हे लोक फिल्म स्टार असू शकतात. पण मतदार मला किंवा गुप्ताजींना खासदार-आमदार बनवतात जेणेकरून आम्ही त्यांची सेवा करू शकू." त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे अनेक नेते संतापले आहेत. ते म्हणतात की, निवडणुका येताच महिलांबद्दल अशोभनीय वक्तव्य करणे हे काँग्रेसचे व्यक्तिमत्त्व बनले आहे. रणदीप सुरजेवालाचा व्हिडिओ शेअर करताना अमित मालवीय म्हणाले,महिलांना XXX बनवले जाते असे मानणारे तुम्ही कोण आहात, असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, “प्रेमाचे दुकान उघडण्याची चर्चा होती, पण काँग्रेसने द्वेषाचे दुकान उघडले आहे. "महिलांबद्दल संकुचित दृष्टीकोन बाळगणेर काँग्रेसचे नेते पराभवाच्या निराशेने आक्षेपार्ह विधानं करत आहे." याआधी काँग्रेसच्या महिला नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनी मंडीतील भाजपच्या उमेदवारावर त्यांच्या इन्स्टा अकाऊंटद्वारे आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यानंतर त्यांना भाजपकडून विरोध झाला. दरम्यान सुप्रिया श्रीनेटची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आणि नंतर निवडणूक आयोगानेही त्यांना फटकारले आहे.