नेपाळच्या सीमेवर दोन पाकिस्तानींना 'एटीएस'ने पकडले; चौकशीतून झाला मोठा खुलासा!

    04-Apr-2024
Total Views |
 Indo-Nepal Bordar
 
लखनौ : लोकसभा निवडणुकीदरम्यान, महाराजगंज जिल्ह्याला लागून असलेल्या भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा यंत्रणांनी तीन संशयितांना अटक करून त्यांना एटीएसच्या ताब्यात दिले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन पाकिस्तानी आणि एक जम्मू-काश्मीरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून पाकिस्तानी पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी रात्री इमिग्रेशन विभागाचे अधिकारी सोनौली सीमेवर भारतातून नेपाळला जाणाऱ्या लोकांची तपासणी करत होते. दरम्यान, नेपाळला जाण्यासाठी बस सीमेवर पोहोचली. बसची तपासणी केली असता तिन्ही संशयित पकडले गेले. चौकशीदरम्यान यातील दोन तरुण पाकिस्तानचे असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून पाकिस्तानी पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. तर एक तरुण जम्मू-काश्मीरचा रहिवासी होता. त्याच्याकडून आधारकार्ड जप्त करण्यात आले.
 
 
चौकशीअंती, पाकिस्तानी तरुणाची ओळख मोहम्मद अल्ताफ, रहिवासी, पाकव्याप्त काश्मीर, तर दुसरा तरुण सय्यद गझनी मोहम्मद सईद, रहिवासी लरकाना पाकिस्तान. तर नासिर जमाल हा कासिम अहमद, कारलपोल, श्रीनगर, जम्मू-काश्मीर चा रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी रात्रीच लखनौ एटीएसने तीन संशयितांना चौकशीसाठी सोबत नेले. मात्र, स्थानिक पोलीस प्रशासनाने याबाबत मौन बाळगले आहे.
 
दि. २६ मार्च २०२४ रोजीही दोन चिनी नागरिकांना नेपाळ सीमेवरून पकडले होते. सिद्धार्थनगर येथे एसएसबीने त्यांना पकडण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या चिनी नागरिकांमध्ये एक महिला आणि दुसरा पुरुष आहे. या दोघांकडून चिनी आणि नेपाळी सिम व्यतिरिक्त अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. बाभनी तिराहेजवळून एका महिलेसह दोन संशयित व्यक्ती नेपाळमार्गे भारतीय हद्दीत प्रवेश करताना दिसल्या.
 
 
पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्या व्यक्तीचे नाव झोउ पुलिन आणि महिलेचे नाव युवान होते. झोउ पुलिन हा चीनच्या सिचुआन प्रांताचे रहिवासी आहेत तर युआन युहान हे झोंगकिंग जिल्ह्याचे रहिवासी आहेत. दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आले आहे.