‘वेंगुर्ला रॉक्स’वरील ‘भारतीय पाकोळी’च्या अधिवासाची क्षमता संपुष्टात येण्याच्या मार्गावर

    30-Apr-2024   
Total Views |
vengurla rocks


मुंबई (अक्षय मांडवकर) -
सिंधुदुर्गातील वेंगुर्ला रॉक्समध्ये (vengurla rocks) अधिवास करणार्‍या भारतीय पाकोळी पक्ष्याची येथील गुहांमधील वीण वसाहतीची क्षमता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत भविष्यातील चक्रीवादळे आणि हवामान बदलांमुळे हे पक्षी नामशेष होण्याची शक्यता संशोधकांनी वर्तविली आहे (vengurla rocks). संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार २०२० ते २०२३ या काळात या पक्ष्यांच्या संख्येमध्ये अनेक चढ-उतार आले आहेत (vengurla rocks). हे चढ-उतार असेच सुरू राहिल्यास आणि अधिवासाची क्षमता भरल्यास, हे पक्षी त्याठिकाणाहून नामशेष होण्याची भीती आहे (vengurla rocks). त्यामुळे या पक्ष्यांचे संवर्धन आणि नियमित निरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे. (vengurla rocks)

भारतीय पाकोळी या पक्ष्याची जगातील सर्वात मोठी वीण वसाहत ही वेंगुर्ला रॉक्स द्वीपसमूहातील बेटांवर आहे. ब्रिटीश संशोधक जेर्डन यांनी १८६२ साली सर्वप्रथम या द्वीपसमूहातील ‘बंट्’ बेटावर अधिवास करणार्‍या भारतीय पाकोळी पक्ष्यांची नोंद केली होती. गेल्या १६१ वर्षांपासून ‘बंट्’ बेटावरील गुहेमध्ये या पक्ष्यांचा अधिवास आहे. दरम्यानच्या काळात द्वीपसमूहातील दुसर्‍या एका बेटावर या पक्ष्यांची घरटी असल्याचे प्रकाशझोतात आले. सालीम अली पक्षीशास्त्र व प्रकृती विज्ञान केंद्रा’चे (सेकॉन) (भारतीय वन्यजीव संस्थानचे दक्षिण भारतातील केंद्र) संशोधक २०२० सालापासून दोन्ही बेटांवरील भारतीय पाकोळी पक्षी आणि त्यांचा अधिवासावर अभ्यास करत आहेत. यामध्ये, ‘सेकॉन’चे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. शिरीष मंची आणि पीएचडी विद्यार्थी धनुषा कावलकर यांचा समावेश आहे. २०२० ते २०२३ या काळात त्यांनी याठिकाणाहून नोंदविलेली शास्त्रीय माहिती ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’ या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित केली आहे.


 
 
संशोधकांनी नोंदविलेल्या नोंदीनुसार २०२० ते २०२३ या काळात ‘बंट्’ बेटावरील गुहांमध्ये भारतीय पाकोळीच्या संख्येचा बदलाचा दर हा ५.५ टक्के आहे. तर दुसर्‍या एका बेटावरील या पक्ष्यांच्या संख्येचा बदलाचा दर वजा ५३ टक्के आहे. दोन्ही बेटांवरील भारतीय पाकोळीच्या संख्येमधील चढ-उतार अभ्यासण्यासाठी संशोधकांनी ‘लॉजिस्टिक पॉप्युलेशन ग्रोथ मॉडल’चा वापर केला आहे. दोन्ही बेटांवरील पक्ष्यांच्या वीण वसाहतीची क्षमता ही संपुष्टात येण्याच्या पातळीवर पोहोचली असल्याचे या शोधातून स्पष्ट झाले आहे. मॉडेलच्या अंदाजानुसार, २०२० ते २०७० दरम्यान दोन्ही बेटांवरील पक्ष्यांच्या संख्येमध्ये किंचित चढ-उतार होत राहतील. यास जबाबदार असणार्‍या घटकांपैकी काही घटक हे अज्ञात आहेत. मात्र, संशोधकांनी सर्व सामान्य पक्ष्यांच्या प्रजातींच्या संख्येत होणार्‍या घटीला आणि चढ-उतारांसाठी कारक असणार्‍या काही घटकांची नोंद केली आहे. यामध्ये टप्प्या-टप्प्यांमध्ये होणारे प्रजनन, विणीमध्ये ठवलेले नियंत्रण, एकत्रितपणे केलेली आत्महत्या, अंड्यांमधील घट अशी पक्ष्यांनी स्वत:हून ठरवून केलेले काही घटक, तर नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल, वीण वसाहतींची कमतरता आणि शिकार हे बाह्य घटकदेखील कारणीभूत ठरू शकतात.


संख्या काय सांगते?
१९४० आणि १९६२ साली संशोधक अब्दुलाली यांनी बंट् बेटावरुन पाच हजार पक्षी आणि सुमारे २ हजार, ५०० घरट्यांची नोंद केली होती. त्यानंतर २००१ साली येथील गुहेमधून बेकायदा होणार्‍या या पक्ष्यांच्या घरट्यांची तस्करी ज्यावेळी पकडली, तेव्हा, याठिकाणी ३ हजार, ६०० पक्षी असल्याचा अंदाज मांडण्यात आला होता. २००६ साली या संख्येत वाढ होऊन ती पाच हजार झाली. २०२० साली मंची आणि कावलकर यांनी केलेल्या अभ्यासात त्यांनी चार हजार पक्षी व दोन हजार घरट्यांची नोंद केली. तर २०२१ मध्ये ४ हजार, ६७४, २००२ मध्ये ३ हजार, ९२० आणि २०२३ मध्ये ४ हजार, २२० पक्ष्यांची नोंद करण्यात आली. तर, दुसर्‍या बेटावर २००१ साली अंदाजे ६० पक्षी आणि ३० घरटी होते. याठिकाणी २०२० साली २४६, २०२१ मध्ये १९६, २०२२ मध्ये ९२ आणि २०२३ मध्ये ११६ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. २०२१ साली वेंगुर्ला रॉक्स द्वीपसमूहाला तोत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला. परिणामी येथील दोन्ही बेटांवरील पक्ष्यांच्या संख्येत २०२२ साली घट झालेली दिसून येते.

नव्या जागेची गरज
वेंगुर्ला रॉक्सवरील भारतीय पाकोळ्यांची वीण वसाहतीची नोंद १०० वर्षांपेक्षा अधिक काळापासून आहे. त्यामुळे येथील या पक्ष्यांच्या संख्येमध्ये होणारे चढ-उतारांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. येथील पक्ष्यांच्या वसाहतीचे वर्तन आणि परिवर्तनाच्या वेळेचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. बंट् बेटाव्यतिरिक्त दुसर्‍या बेटावर या पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी मर्यादित जागा उपलब्ध राहिली आहे. त्यामुळे पक्ष्यांसाठी प्रजननाची योग्य जागा निर्माण करणे महत्त्वाचे आहे. - डॉ. शिरीष मंची, प्रधान शास्त्रज्ञ, सेकॉन


अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.